IMD Rain Alert : 12 ते 15 जुलै दरम्यान या भागात मुसळधार पावसाचा इशारा

| Updated on: Jul 11, 2024 | 8:07 PM

मुंबई आणि महाराष्ट्रात अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे. अनेक ठिकाणी अजूनही तुरळक पाऊस झाला आहे. मुंबईत देखील पावसाने अजून हवी तशी हजेरी लावलेली नाही. त्यातच पुढील पाच दिवस मुंबई हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.

IMD Rain Alert : 12 ते 15 जुलै दरम्यान या भागात मुसळधार पावसाचा इशारा
Follow us on

देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या चांगला पाऊस होत आहे. काही राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झालीये. दरम्यान, हवामान खात्याने देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील 2 दिवसात ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असं आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार यांनी सांगितले आहे. तर 12 ते 15 जुलै दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि किनारी कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) गुरुवारी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. शुक्रवार आणि शनिवारी मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, 7 जुलै ते 9 जुलै दरम्यान मुंबईत 422 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 7 जुलै ते 8 जुलै दरम्यान अवघ्या 24 तासांत 268 मिमी पावसाची नोंद झालीये.

नरेश कुमार म्हणाले की, “बुधवारपर्यंत मान्सून सामान्य स्थितीत होता. पण आता मान्सून उत्तरेकडे सरकलाय. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची स्थिती आहे. हवामान खात्याने आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश या राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

11 ते 14 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस

IMD ने पुढील 5 दिवसांत ईशान्य भारतात हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशामध्ये हलका ते जोरदार पाऊस पडू शकतो. 11 ते 14 जुलै दरम्यान उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार आणि अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.