Manoj jarange patil | मराठा आरक्षण आंदोलनाचा विजय झाल्यानंतर नवी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा पार पडली. यावेळी जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. ज्याला जिथे जागा मिळाली, तिथून तो ऐकत होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या सभेला उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांच यावेळी ऐतिहासिक भाषण झालं. हा विजयी मेळावा होता. डोक्याला गुलाल लागला. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार हा मनोज जरांगे पाटील यांनी शब्द दिलेला, तो त्यांनी पूर्ण करुन दाखवला. या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले तसेच काही महत्त्वाच्या मुद्यांना स्पर्श केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणातील पाच प्रमुख मुद्दे
– मराठा समाजासाठी राजपत्र निघालय ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या जीआरमुळे हा गुलाल उधळलाय. फक्त त्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, एवढीच शिंदे साहेंब तुम्हाला विनंती आहे. जीआर कायम राहिला पाहिजे. याच बरोबर ज्याची नोंद मिळाली, त्यांच शपथपत्र घेऊन सोऱ्यांना देण्यात याव. गृहचौकशी नंतर करा.
– शिंदे समितीला वर्षभर काम करु द्या. गोरगरीब मराठ्यांच चांगलं होईल. मराठवाड्याच 1884 गॅजेट आहे, ते शिंदे समितीकडे द्यावं. ते लागू करावं. आमचा फायदा होईल. कारण मराठवाड्यात खूप कमी कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मला माझ्या जातीचा स्वाभिमान आणि अभिमान आहे. माझी जात एका शब्दानेही पुढे जात नाही, हा मला गर्व आहे.
– अध्यादेशाला काही धोका झाला, तर आझाद मैदानात मी लगेच आलो म्हणून समजा. आरक्षणात कधी अडचण झाली, तर सोडवायला मी पुढे असणार.
– आरक्षणाल मारलेले खुट्टे उपटून फेकणार म्हणजे फेकणार बोललेलो. मराठ्यांच्या नादी लागायच नाही. तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला, तर आमचा नाईलाज आहे. आम्ही गावखेड्यात मराठा आणि ओबीसीमध्ये वाद होऊ दिला नाही. छोटा-मोठा भाऊ म्हणून गुण्यागोविंदाने राहतो. नेते आमच्यात भांडण लावतात.
– अध्यादेश टिकवून ठेवण्याची, लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आहे. हा गुलाल अध्यादेशचा आहे, त्याचा सन्मान राहू दे. हा विजय महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांचा आहे.