नाशिकः यंदा आवाज कुणाचा, अशी आरोळी ठोकली तर उत्तर येईल महागाईचा. कारण पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरसोबतच आता फटाक्यांच्या किमतीमध्येही जवळपास सरासरी 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोरोनाने गेल्या वर्षीची दिवाळी अतिशय सुनी सुनी साजरी झाली. यंदा रुग्ण संख्येत झपाट्याने घट होतेय. लसीकरणात मोठ्या संख्येने वाढ झालीय. सरकारने निर्बंध सैल केले आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी जंगी साजरी होईल, अशी शक्यता आहे. मात्र, यावर महागाई पाणी फेरणार असेच दिसते आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर प्रचंड वाढत आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे गणित बिघडले आहे. त्यातच आता फटाक्यांच्या किमतीमध्ये सरासरी पंधरा ते वीस टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसत आहे.
अशा वाढल्या किमती
नागगोळी आणि रॉकेटची किंमत जवळपास दहा टक्क्यांनी महागली आहे. चक्री आणि सुतळी बॉम्बच्या दरात पंधरा टक्क्यांची वाढ पाहायला मिळत आहे. लवंगीमध्ये वीस टक्के तर झाडाच्या किमतीमध्ये पंचवीस ते पस्तीस टक्के वाढ झाल्याची माहिती अशोकामार्ग येथील फटाके विक्रेते व्ही. आर. खाडे यांनी दिली. कोरोनामुळे यंदा अनेक उद्योजकांनी फटाके निर्मिती कमी केली. त्यात कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. ज्या ठिकाणी फटाकांच्या कारखाने आहेत तिथे लॉकडाऊनमुळे मजूर मिळाले नाहीत. या साऱ्यांच्या परिणामामुळे फटाक्यांच्या किमती महागल्याचेही खाडे यांनी सांगितले.
मालेगावमध्ये रात्री 10 ते सकाळी 6 बंदी
मालेगावमध्ये रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्यावर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने 2 नोव्हेंबर 2001 रोजी एक निर्णय दिला. त्यानुसार आणि मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) अन्वये हे निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, या निर्बंधातून फक्त 4 नोव्हेंबर दिवशी सूट देण्यात आली आहे, अशी माहितीही आयुक्तांनी दिली. 3.8 सेंटिमीटरपेक्षा जास्त लांबीचे फटाके ,अॅटमबॉम्ब फटाके, क्लोरेटचा समावेश असलेले फटाके, पिवळे फॉस्फरयुक्त फटाके यांच्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
प्रदूषणमुक्त दिवाळीचे आवाहन
फटाके न फोडता यंदाची दिवाळी साजरी करा, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे. गेल्या काही वर्षांपासून निसर्गचक्र बदलले आहे. ठिकठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस पडतो आहे. तर कुठे जीवघेणा दुष्काळ. हे सारे हवामान बदलाचे परिणाम आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून प्रदूषण टाळण्यासाठी फटाके उडवू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
इतर बातम्याः
सहकारमध्ये खूप राजकारण, भुजबळांनी ते भोगलं; पंकजा यांचे नाशिकमध्ये प्रतिपादन
Aishwarya Rai birthday | ‘ब्युटी विथ ब्रेन’ ऐश्वर्या राय बच्चन करोडोंची मालकीण, जाणून घ्या तिच्या संपत्ती बद्दल सर्वकाही https://t.co/5HPo7PycnW#AishwaryaRai | #AishwaryaraiBachchan | #AishwaryaRaiBachchan
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 1, 2021