नाशिक : उद्धव ठाकरे गटाचे नाशिकचे संपर्कप्रमुक तथा संजय राऊत यांचे अत्यंत जवळची व्यक्ती म्हणून ओळख असलेल्या भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या आठवड्यात संजय राऊत यांच्या खांद्याला खांदा लावून दौऱ्यात सहभागी असलेल्या भाऊसाहेब चौधरी यांनी प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांना जामीन मिळाला त्यावेळी त्यांचा जामीनदार म्हणून भाऊसाहेब चौधरी यांनी सही केली होती. त्यामुळे संजय राऊत यांचा जामीनदारच शिंदे गटाने फोडल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. अशी सर्व परिस्थिती असतांना आता नाशिकमधील माजी मंत्री आणि माजी आमदार यांच्यासह माजी नगरसेवक असे एकूण पाच जण शिंदे गटात जाण्यासाठी तयारी करत आहे. हिवाळी अधिवेशन दरम्यान हे प्रवेश होण्याची शक्यता अधिक असली तरी घाई-घाईने प्रवेश नको, मुंबई किंवा नाशिकमध्ये प्रवेश सोहळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यातील ठाकरे गटातील माजी आमदार आणि एका माजी मंत्र्याचा आणि तीन नगरसेवकांचा प्रवेश रेंगळला आहे.
नवीन वर्षात हे प्रवेश व्हावे अशी इच्छा असल्याने भाऊसाहेब चौधरी, सुनील पाटील यांचा प्रवेश सोहळा लवकर उरकल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पाच जण पुन्हा शिंदे गटाच्या वाटेवर असल्याने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी संजय राऊत पुन्हा नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या नव्या प्रवेशाने शिर्डीसह, नाशिकरोड-देवळाली, नाशिक पश्चिम या मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा फटका बसणार असल्याने हे प्रवेश रोखण्यासाठी प्रयत्न होणार आहे.
मागील आठवड्यात 13 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता, त्यात संपर्कप्रमुख आणि ग्रामीण जिल्हाप्रमुख यांनीही शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला गळती लागल्याचे बघायला मिळत आहे.
आता माजी मंत्री, माजी आमदार आणि माजी नगरसेवक यांचा प्रवेश सोहळा कधी आणि कुठे होतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.