पालघर : पालघर (palghar) जिल्ह्यातील डहाणू (dahanu) तालुक्यातील कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक महिन्यांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांची चार पदे रिक्त आहेत. रिक्त पदं असल्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या बाह्यरुग्ण (ओपीडी) तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना डॉक्टरांची वाट पाहावी लागतं आहे. वैद्यकीय अधिकारी (medical officer) नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळत नाही. त्याचबरोबर गरोदर माता अपघातग्रस्त रुग्ण अशांना तात्काळ सेवा मिळणे गरजेचे आहे. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे या रुग्णांना वेळेवर सेवा मिळत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून 50 खाटाचे उपजिल्हा रुग्णालय डहाणू तालुक्यातील कासा येथे बांधण्यात आले आहे. गोरगरीब आदिवासी रुग्णाची सोय उपलब्ध होईल, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्याची पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यांना खाजगी दवाखान्यात जाऊन महागडे उपचार घ्यावे लागत आहेत.
कासा येथे महाराष्ट्र शासनाचे उपजिल्हा रुग्णालय आहे. सदर उपजिल्हा रुग्णालयावर परिसरातील पंधरा ते वीस गावामधील चाळीस पेक्षा जास्त पाड्यावरील रुग्ण अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या जवळूनच मुंबई अहमदबाद हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने अपघात ग्रस्त होऊन अनेक गंभीर अपघातग्रस्त रुग्णांना सुद्धा या ठिकाणी उपचारासाठी आणले जाते. परंतु या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने बऱ्याचदा रुग्णांना मुंबई ठाणे किंवा शेजारील गुजरात राज्यात उपचारासाठी जावे लागत आहे.
उपजिल्हा रुग्णालयात एकूण सात वैद्यकीय अधिकाऱ्याची पदे आहेत. यापैकी चार पदे रिक्त आहेत, जिल्हा रुग्णालयात दररोज ११० ते १२५ पर्यंत तपासणी केली जाते. तीनच वैद्यकीय अधिकारी असल्यामुळे गरोदर मातांची प्रसूती करणे, रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची तपासणी करणे यामध्ये उपलब्ध असलेले डॉक्टर गुंतले जातात. तीन डॉक्टर असल्याने डॉक्टरांवर सुध्दा कामाचा अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागात वेळेवर डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांना डॉक्टर येण्याची वाट पाहावी लागते.