सांगली : महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजमध्ये आणखी वाढ करावी, अशी मागणी माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली. तसेच ही मदत पुरेशी नसून मलमपट्टी करणारी आहे. केंद्र सरकारनेही आणखी मदत केली पाहिजे, असे मतही आमदार महादेव जानकर यांनी व्यक्त केले. सांगली जिल्ह्यातल्या बहे या ठिकाणी पूरग्रस्त पाहणी दौऱ्यादरम्यान ते बोलत होते.
सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची माजी मंत्री आणि आमदार महादेव जानकर यांनी पाहणी केली. वाळवा तालुक्यातील बहे येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करत जानकर यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महादेव जानकर म्हणाले, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये यंदा महापुराने मोठे नुकसान झाले आहे.यातून पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करण्यासाठी राज्य सरकारकडून भरीव मदत झाली पाहिजे. राज्य सरकारने 11 हजार 500 कोटींचे मदतीचे पॅकेज जाहीर केले.
मात्र हे पुरेसं नाही, मलमपट्टी करणारी ही मदत आहेत. त्यामुळे त्याहीपेक्षा अधिक मदत केली पाहिजे. तसेच केंद्र सरकारने साडेसातशे कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे, मात्र नुकसान मोठा असल्याने केंद्राने राज्याला अधिकची मदत द्यावी, अशी मागणी महादेव जानकर यांनी यावेळी केली. याबाबत मुख्यमंत्री आणि केंद्राला याबाबत अहवाल पाठवणार असल्याचं जानकर यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर कोयना धरणाचे जे अतिरिक्त पाणी समुद्रात वाहून जातं, ते राज्य सरकारने पाईपलाईनद्वारे कोकणात आणि दुष्काळी भागात द्यावे, जेणेकरून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आणि कोकणातून स्थलांतरित होणाऱ्या तरुणांना त्याचा फायदा होईल, अशी मागणीही यावेळी आमदार महादेव जानकर यांनी केली.
संबंधित बातम्या
पूरग्रस्तांसाठी नवी मुंबई महापालिकेचा सिंहाचा वाटा, 206 स्वयंसेवकांचं पथक चिपळूणकडे रवाना
पनवेल रेल्वे स्थानकात समस्यांचा पाऊस, स्टेशन मॅनेजर यांचे तत्काळ समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश
Increase flood relief package, demands MLA Mahadev Jankar