आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर ‘नो एन्ट्री’, त्या ठिकाणी नेमके काय घडले…आमदार भोंडेकर म्हणाले…

| Updated on: Sep 21, 2024 | 5:09 PM

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द नक्कीच ते पूर्ण करतील. कारण त्यांनी निधी तर भरपूर दिलेला आहे. आता तिकीट असेल किंवा जिल्ह्याला शोभेल असे पद ते देतील. आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे मंत्रिपद मागून बघून काही होणार नाही.

आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर नो एन्ट्री, त्या ठिकाणी नेमके काय घडले...आमदार भोंडेकर म्हणाले...
Narendra Bhondekar and eknath shinde
Follow us on

शिवसेना शिंदे गटाचे समर्थक भंडाऱ्यातील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांना नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांना परत जावे लागले. नागपुरातील ‘रामगिरी’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाचे गेट न उघडल्याने त्यांना परत जावे लागले, अशा बातम्या आल्या. त्यावर ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी स्पष्टीकरण दिले. त्या ठिकाणी काय घडले? ते त्यांनी सांगितले.

काय घडले ‘रामगिरी’ बंगल्यावर

आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले, मी रामगिरी बंगल्यावर गेलो होता. त्याच्या आधी माझी विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली. मी त्यांना सांगितले होते की, तुम्ही बंगल्यावर गेल्यावर मी भेटायला येतो. त्यानुसार मी बंगल्यावर गेलो. बंगल्याच्या गेटवर गेल्यानंतर पीआयने सांगितले की, साहेब आराम करत आहेत. त्यांनी कोणालाच भेटायला नाही सांगितले आहे. मी म्हटले, ठीक आहे आणि त्या ठिकाणावरुन निघालो. परंतु दहा मिनिटांतच मला साहेबांचा फोन आला. ते म्हणाले, नरेंद्र काही काम असेल तर ये. त्यानंतर मी त्यांच्या बंगल्यावर गेलो. दोन तास बसलो होतो. सोबत आम्ही जेवणही केले. साहेब तसे कोणाची भेट नाकारत नाही. मग ते माझी भेट कशाला नाकारतील, असे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.

किशोरी पेडणेकरांकडून चुकीची माहिती

आमदार नरेंद्र भोंडकर म्हणाले, किशोरी पेडणेकर भंडाऱ्यात शिंदे साहेबांनी माझी भेट नाकारल्याची चुकीची माहिती दिली.त्या अर्धवट माहिती घेतात. किशोरी ताई तुम्हाला माहिती नसते तर तुम्ही का बोलतात? 2019 मध्ये आम्ही जेव्हा तिकीट मागत होतो, फोन करत होतो. तेव्हा तुम्ही कुठे लपल्या होत्या? पूर्व विदर्भातील आमदार किंवा जिल्हाप्रमुखांचे फोन उचलत नव्हते. त्यावेळी उद्धव ठाकरेसुद्धा फोन उचलत नव्हते. त्यावेळी तुम्ही पूर्ण पूर्व विदर्भाची शिवसेना भाजपकडे गहाण ठेवली होती. त्यावेळी आठवत नव्हते का शिवसैनिक – पदाधिकारी. आम्ही आमच्या ताकदीने निवडून आलो आहोत.

हे सुद्धा वाचा

अपक्ष निवडून आलो आहोत. आम्हाला मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबत जायचे होते. आम्ही विकास निधी नाही आणला तर लोकांना न्याय कसे देणार? तुमच्या पक्षाच्या चिन्हावर आम्ही आलोत का? तुम्ही आम्हाला तिकीट दिली का? बोलताना तुम्हाला थोडे तरी वाटायला पाहिजे, असे पेडणेकर यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेवर त्यांनी उत्तर दिले.

मुख्यमंत्री शब्द पूर्ण करतील

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द नक्कीच ते पूर्ण करतील. कारण त्यांनी निधी तर भरपूर दिलेला आहे. आता तिकीट असेल किंवा जिल्ह्याला शोभेल असे पद ते देतील. आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे मंत्रिपद मागून बघून काही होणार नाही. पण आता शेवटच्या पंधरा-वीस दिवसांमध्ये किती चांगले काम मतदारसंघासाठी करता येतील यावर आमचा फोकस आहे, असे आमदार नरेंद्र भोंडकर यांनी सांगितले.

हे ही वाचा…

उद्धव साहेब, तुम्ही पक्ष घेऊन चालले कुठे…अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा हल्ला