Bomb Threat: गेल्या काही दिवसांपासून विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचे फोन मिळत आहे. गुरुवारी पुन्हा विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. नागपूरवरुन कोलकाता जाणाऱ्या इंडिगो एअरलाईनच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. त्यानंतर विमानाचे तातडीने आपत्कालीन लँडींग करण्यात आले. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर विमान रायपूर विमानतळावर उतरवण्यात आले.
इंडिगोची फ्लाइट बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. या घटनेची माहिती देताना रायपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कीर्तन राठौर यांनी सांगितले की, इंडिगोचे विमान नागपूरवरुन कोलकातासाठी निघाले होते. त्यानंतर विमान रायपूरला उतरवण्यात आले. विमानातील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. विमानाची तपासणी केली जात आहे. तसेच या घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
विमानातून १५० प्रवाशी प्रवास करत होते. सकाळी ९ वाजता विमानतळ अधिकाऱ्यांना फोन आला. त्याद्वारे विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली. त्यानंतर विमान डायवर्ट करुन रायपूरला उतरवण्यात आले. त्याठिकाणी सीआयएसएफ आणि रायपूर पोलिसांच्या टीमने तपासणी सुरु केली आहे.
Raipur, Chhattisgarh: A flight from Nagpur to Kolkata made an emergency landing at Raipur airport following a bomb threat. The plane is being checked at the airport and further probe is underway: SSP Santosh Singh
— ANI (@ANI) November 14, 2024
ऑक्टोबर महिन्यापासून सातत्याने विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या मिळत आहे. जवळपास ९० विमानांध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या गेल्या दोन महिन्यात मिळाल्या आहेत. या सर्व धमक्या खोट्या निघाल्या आहेत. परंतु यामुळे २०० कोटींचे नुकसान झाले आहे.
देशभरातील विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या जगदीश उईके या नावाच्या व्यक्तीस काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांनी अटक केली होती. त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीत तो दिशाभूल करत असणारी माहिती दिल्याचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी सांगितले होते. आता या धमकी प्रकरणात तो आहे का? हा प्रश्न समोर आला आहे. एनआयए, आयबी, एटीएसकडून त्याची चौकशी केली जाणार आहे. तो अकरावीपर्यंत शिकला असल्याचा दावा करत आहे.