बेळगावः बेळगाव अधिवेशनाला विरोध करणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना सोमवारी कन्नडीगांनी काळे फासण्याचा अगोचरपणा केला. त्यामुळे जनक्षोभ उसळला असून, मराठी भाषकांमध्ये याविरोधात तीव्र संताप आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या मंगळवारी बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बेळगावमध्ये मराठी लोकांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराचा प्रश्न पेटणार आहे.
का केले कृत्य?
कर्नाटक विधानसभेचे आज बेळगावमध्ये अधिवेशन सुरू होत आहे. मात्र, या अधिवेशनाला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिताच विरोध आहे. या अधिवेशनाचा निषेध करण्यासाठी बेळगावमध्ये समितीकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सकाळपासून हा महामेळावा हाणून पाडण्याचे प्रयत्न सुरू होते. पोलिसांकडूनही तसा दबाव आणला जात होता. त्यामुळे घटनास्थळीही तणाव होता. अशावेळी अचानक कन्नड म्युझिक संघटनेच्या दोघांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली. त्यामुळे पुन्हा एकदा बेळगाप्रश्न पेटला आहे.
हजारो लोक येणार
बेळगावमधील सुवर्ण विधानसौधमध्ये आज सोमवारपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन दहा दिवस चालणार आहे. यंदा या अधिवेशनाच्या खर्चाची मर्यादा मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनी निम्म्यावर आणलीय. मात्र, तरीही 12 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. अधिवेशनाला येणाऱ्या हजारो जणांची बेळगावातच राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी 2800 पोलीस कॉन्स्टेबल आणि 500 हून अधिक पोलीस अधिकारी आले आहेत. विशेष म्हणजे पोलीस वगळता 4500 पेक्षा जास्त लोकांसाठी तब्बल 2100 खोल्या बुक केल्या आहेत.
महाराष्ट्र आक्रमक होणार?
कर्नाटक आणि विशेषतः बेळगाव परिसरातील मराठी भाषकांची गळचेपी करण्यासाठीच बेळगाव येथे विधानसभा अधिवेशन सुरू करण्यात आले आहे. या अधिवेशनाला सुरुवातीपासूनच मराठी भाषकांचा विरोध आहे. आता ऐन अधिवेशनाच्या दिवशी कन्नडीगांनी केलेल्या या अगोचरपणामुळे मराठी भाषकांमध्ये प्रचंड संताप आहे. सध्या महाराष्ट्रात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे असो की बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने मराठीचा मुद्दा लावून धरला आहे. आता शिवसेना आणि मुख्यमंत्री काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्याः