मनोज कुलकर्णी, नाशिकः जगाला संकटाच्या खाईत लोटणारे कोराना संकट. त्यामुळे अनेक कंपन्यांची विस्कटलेली आर्थिक घडी, शेअर बाजारात आलेली मरगळ आणि स्थावर मालमत्तेतली शिथिलता पाहता गुंतवणुकीचा विश्वासार्ह हुकमी एक्का म्हणून गुंतवणूकदार सोन्याकडे पाहत आहेत. विशेष म्हणजे सोन्यातून तसा खणखणीत वाजवून परतावाही मिळत आहे.
अगदी प्राचीन काळापासून भारतालाच नव्हे तर जगाला सोन्याचे अक्षरशः वेड आहे. भारतात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती का देतात, याचे उत्तर हे गुंतवणूकदारांना मिळणारा भरमसाठ नफा हेच असावे. गेल्या 300 वर्षांचा सोन्यातील भाव वाढीचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, 1720 ते 1920 या 200 वर्षांत फक्त 3 वेळेस अपवाद वगळता भाव स्थिर होते. म्हणजे 200 वर्षांत फक्त तीनदाच भाववाढ झालेली. गेल्या 100 वर्षांत प्रत्येक 10 वर्षांत वाढलेले प्रती तोळा भाव व त्याची वाढलेली टक्केवारीवर एक नजर टाका. तुम्हाला सारेच चित्र स्पष्ट होईल.
साल – भाव – वाढलेली टक्केवारी
1920 -17.20 रु
1930 – 21.90 रु – 27.60%
1940 – 42.80 रु – 95.40%
1950 – 115.90 रु – 170.70%
1960 – 130.50 रु – 12.60%
1970 – 184.50 रु – 41.25%
1980 – 1330 रु – 620.00%
1990 – 3200 रु – 240.00%
2000 – 4550 रु – 70.30%
2010 – 16450 रु – 359.30%
2020 – 43400 रु – 263.00%
एकंदर सोन्याचे दर किती तरी पटीने वाढत गेले. आपण अगदी अलीकडचा विचार केला तर दोन हजार साली साडेचार हजार रुपये तोळा असणारे सोने चक्क वीस वर्षांत 43400 वर गेले. इतका तुफान परतावा अजून कुठल्या गुंतवणुकीत मिळाला नाही. आता आपण गेल्या गेल्या 10 वर्षांच्या भाववाढीच्या तक्त्यावर नजर टाकू.
साल – भाव – वाढलेली टक्केवारी
2010 – 16450
2011 – 18800 – 11.42%
2012 – 23000 – 12.23%
2013 – 26880 – 11.68%
2014 – 27600 – 2.30%
2015 – 29500 – 6.90%
2016 – 31700 – 7.50%
2017 – 29800 – 6.00%
2018 – 30800 – 3.40%
2019 – 34800 – 13.00%
2020 – 43400 – 24.71%
2021 – 45200 – 4.10%
मागील एक वर्षात सोने भाववाढीला किंचित ब्रेक लागला. मात्र, येणाऱ्या काळात पुन्हा एकदा भाव वाढतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या तीन ते पाच वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या पाच वर्षांत दहा ग्रॅम सोन्याचा दर नव्वद हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस तीन हजार ते पाच हजार डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.
सोने गुंतवणुकीचे प्रकार आणि फायदा
सोन्याच्या गुंतवणुकीचे ढोबळमानाने दोन प्रकार आहेत. त्यात पहिला प्रकार प्रत्यक्ष खरेदी आणि दुसरा प्रकार हा अप्रत्यक्ष खरेदी. प्रत्यक्ष खरेदीमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक म्हणून बार, वेढणी, शिक्का यास्वरूपात अनेकजण सोन्याची खरेदी करतात. तर अनेक जण वापराचे दागदागिन्या स्वरूपात खरेदी करायला पसंदी देतात. अप्रत्यक्ष खरेदमध्ये सोन्याची खरेदी केली जात नाही, तर त्याऐवजी सोने बॉण्ड सर्टिफिकेट स्वरूपात खरेदी केले जाते. विशेष म्हणजे आता भारत सरकारनेही गुंतवणुकीसाठी सोव्हरीन बॉण्ड बाजारात आणले होते. ईटीएफ फंड, गोल्ड फंड, कमोडिटी वायदे बाजारातही सोने खरेदी केली जाते. मात्र, भारतीय लोक प्रत्यक्ष खरेदीलाच प्राधान्य देतात. ज्या ग्राहकांनी 10 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये सोन्यात गुंतविले असतील तर त्यांना रोज सरासरी 70.68 रु प्रती दिन भाववाढ होऊन नफा मिळाला. तुम्ही जर दहा वर्षांपूर्वी एक तोळा सोने खरेदी केले असेल, तर 8.14 रुपये प्रती दिन भाववाढीमुळे नफा झाला आहे.
भारतात सर्वसामान्य ते श्रीमंत वर्ग हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यालाच पसंती देतो. अगदी सोने खरेदी बाबत आपल्या पिढ्यान पिढ्यापासून सोन्यातील गुंतवणुकी बाबत महत्व सांगितले जाते. आजही आपल्या मासिक पगारातील ठराविक रक्कम अनेकजण सोने खरेदीसाठी राखीव ठेवतात. त्याचबरोबर प्रत्येक मुहूर्तावर अथवा विशेष तिथीला आवर्जुन सोने खरेदी केली जाते. त्याचे कारण म्हणजे सोन्यातून भरभरून मिळणारा परतावा हेच आहे.
– चेतन राजापूरकर, डायरेक्टर, महाराष्ट्र स्टेट इंडिया बुलीयन अँड ज्वेलर्स असोसिएशन
इतर बातम्याः
नाशिकमधले दादासाहेब फाळके स्मारक कात टाकणार; दिग्दर्शक नितीन देसाई अन् मंत्राज स्पर्धेत
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता; सकाळपासून ढगाळ वातावरण
तीन वर्षांपासून 61 कोटींचे अनुदान थकले; नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मदतीसाठी सरकारकडे डोळे!
नाशिकमधले दादासाहेब फाळके स्मारक कात टाकणार; दिग्दर्शक नितीन देसाई अन् मंत्राज स्पर्धेतhttps://t.co/LoQGyHTHCQ#Nashik|#DadasahebPhalkeMemorial|#DirectorNitinChandrakantDesai|#Mantraj|#NashikMunicipalCorporation
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 17, 2021