नवी दिल्ली : शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि धनुष्यबाणावरची सुनावणी आता लगेच शुक्रवारी आहे. पण खरंच निवडणूक आयोग त्वरित निर्णय देणार का? की धनुष्यबाणाचा निकाल राखून ठेवला जाणार? याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. ठाकरे (Shiv Sena Thackeray Group) आणि शिंदे गटाबरोबरच (Shinde Group), सर्वसामान्यांच्या मनात हाच प्रश्न आहे की, सत्तासंघर्षाचा निकाल घटनापीठासमोर लागण्याआधी, धनुष्यबाणावरुन निवडणूक आयोग निकाल (Ekection Commission) देणार का? कारण निवडणूक आयोगात, मंगळवारी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद झाला आणि पुढची सुनावणी तात्काळ शुक्रवारीच आहे. त्यामुळे शुक्रवारी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला होणार का? याची उत्सुकता आहे. आता यावर घटना तज्ज्ञांना काय वाटतं तेही महत्त्वाचं आहे. पण त्याआधी शक्यता आणि काही प्रश्नांवर नजर टाकणं महत्त्वाचं आहे.
16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टातल्या घटनापीठाच्या निर्णयाच्या आधीच निवडणूक आयोग निकाल देणार का? की सुनावणी पूर्ण करुन केंद्रीय निवडणूक आयोग शिवसेना तसंच धनुष्यबाणाचा निर्णय राखून ठेवणार? केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णय दिलाच तर 16 आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीवर परिणाम होणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
घटनातज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम असो की उल्हास बापट दोघांनाही, लवकरच आयोगातून निकाल येईल असं वाटत नाही. पण शिवसेना पक्ष तसंच धनुष्यबाण चिन्हं कोणाला मिळेल? या प्रश्नावर त्यांनी उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीतल्या संघर्षाचं उदाहरण दिलंय.
सध्या ठाकरे आणि शिंदेंमध्ये जशी रस्सीखेच सुरु झालीय तसंच समाजवादी पार्टीत नेतृत्वावरुन मुलायम सिंह यादव आणि त्यांचेच पुत्र अखिलेश यादवांमध्ये संघर्ष झाला. मात्र संख्यळाच्या आधारावर निकाल अखिलेश यादवांच्या बाजूनं गेला. आणि सपा तसंच सायकल चिन्हं अखिलेश यादवांना मिळालं.
निवडणूक आयोगात ठाकरे गटाकडून अॅड. कपिल सिब्बल आणि शिंदे गटाकडून अॅड. महेश जेठमलानी ताकदीनं युक्तीवाद करतायत. सिब्बलांनी शिंदे गटावर 2 मोठे आक्षेप घेतलेत.
शिंदे स्वत:ला शिवसेनेचे मुख्य नेते म्हणतात. पण शिवसेनेच्या घटनेत मुख्य नेते हे पदच नसून शिवसेना पक्षप्रमुख पद आहे. तसंच सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी असून 7 जिल्हाध्यक्षकांच्या पदावरच आक्षेप घेण्यात आलाय.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावरुन दावे प्रतिदावे निकाल येईपर्यंत सुरुच राहिल. त्याआधी शुक्रवारच्या सुनावणीकडे लक्ष असेल.