बीड : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाजपमधल्या फायरब्रँड नेत्या आणि सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) हे काँग्रेसमधले (Congress) निष्ठावान नेते. पण हे दोन्ही नेते आपापल्या पक्षांवर नाराज असल्याचं दिसतंय. पंकजा मुंडेंनी आज आपण नाराज नाही, असं स्षप्ट जरी केलं असलं तरी त्यांनी भाषणात मात्र तुफान टोलेबाजी केली. “माझं कसं असतंय. मला नाही तर तुलाही नाही असं माझं नाही. मला नाही बाबा. तुझं तू घे पदरात पाडून. आपण राजाच आहे. राजाला फाटके वस्त्र घातले तरी ते लपत नसतं. त्याला सिंहासनावरुन प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसवलं तरी त्याचं तेज लपत नसतं. आपल्या संस्काराप्रमाणे आपण समोरुन बोलणारे आणि मागून वार करणारे लोक नाहीत. दुसऱ्याच्या ताटात जाऊन दोन घास खायची इच्छा नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
एकीकडे पंकजा मुंडे म्हणतायत मी नाराज नाही. पण दुसरीकडे त्यांची वक्तव्ये मात्र त्या नाराज असल्याचीच प्रचिती देतायत. पंकजा मुंडेंनी शिक्षक मतदारसंघातले भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. त्यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. पण भाषणातून खोचक टोलेही मारले.
काही दिवसांपूर्वी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा मराठवाड्यात आले होते. पण त्यांच्या कार्यक्रमाचं पंकजा मुंडेंना निमंत्रणच नव्हतं. पंकजांनी आजच्या भाषणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे स्टेजवर असताना त्यांचा उल्लेख केलाच.
“आमचे जे पी नड्डा अध्यक्ष आले. आम्ही वाट बघत नाही कशाची. आम्ही प्रोटोकॉलनुसार पोहोचलो. आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आले. आम्ही त्यांच्यासाठी पोहोचलो”, असं पंकजा म्हणाल्या.
पंकजा मुंडेंनी आजच्या भाषणात दुसऱ्या कुणाचंही नाव न घेता टोले मारण्याची मालिका सुरुच ठेवली.
“माझं कसं असतंय. मला नाही तर तुलाही नाही असं माझं नाही. मला नाही बाबा. तुझं तू घे पदरात पाडून. पण आपल्याला कुणाला काही मिळत असेल तर आपल्याला आनंद वाटला पाहिजे. एवढं सुरक्षित नेतृत्व पाहिजे. असुरक्षित नेतृत्व जमत नाही. तू तिकडंच का गेला? त्यालाच का बोलला? जातात लोकं”, असं पंकजा म्हणाल्या.
“आपण राजासारखं मन ठेवलं पाहिजे. राजासारखं राहिलं पाहिजे. आपण राजाच आहे. राजाला फाटके वस्त्र घातले तरी ते लपत नसतं. त्याला सिंहासानावरुन प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसवलं तरी त्याचं तेज लपत नसतं. राजासारखं मन ठेवा. हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत आपल्यावर”, असंही पंकजा म्हणाल्या.
“आपल्या संस्काराप्रमाणे आपण समोरुन बोलणारे आणि मागून वार करणारे लोक नाहीत. दुसऱ्याच्या ताटात जाऊन दोन घास खायची इच्छा नाही. आपल्या ताटातली भाकरी खाऊन जगणारी बीड जिल्ह्याची लोकं आहेत”, असं पंकजा म्हणाल्या.
एवढं बोलूनही पंकजांनी आपण नाराज नसल्याचं ठासून सांगितलं. त्याला बावनकुळेंनीही दुजोरा दिला.
“मला आणि बावनकुळे साहेबांना मिडीयानं औरंगाबादला गाठलं. पहिला प्रश्न. पंकजाताईंचं काय? एवढं कशी माझी चिंता. माझं काही नाही रे बाबा. पंकजाताई नाराज आहेत का? मी कशाला नाराज असेन.माझं काय बाप, चुलता कुणी बसलंय का नाराज व्हायला. काही संबंध नाराज व्हायचा. कारण काय. अपेक्षा असेल तर नाराजी आहे. माझी कुणाकडून अपेक्षाच नाही. माझी अपेक्षा समाजाप्रती आहे”, असं पंकजा म्हणाल्या.
इकडे पंकजा मुंडेंनी आपली पक्षावर निष्ठा असल्याचं सांगितलं. तर तिकडे सत्यजित तांबेंनीही आपल्या श्वासाश्वासात काँग्रेस असल्याचा दावा केला.
“जन्मल्यापासून काँग्रेस माहीत आहे आमच्या श्वासात काँग्रेस आहे. सत्ता येते जाते. सत्ता हा आमच्यासाठी महत्वाची नाही . मला निलंबीत केल याचे दु:ख झाले आहे, असं सत्यजित तांबे म्हणाले.
सत्यजित तांबे यांनी पक्षाच्या विरोधात पदवीधर मतदारसंघातून अर्ज भरलाय. सत्यजित तांबेंबाबत भाजपची भूमिकाही तळ्यात मळ्यात आहे. भाजप आणि काँग्रेसमधल्या या दोन नेत्यांना पक्षानं डावलल्याची खंत आहे. त्यांचे पक्ष मात्र या गोष्टी गांभीर्यानं घेणार का हेच पाहावं लागणार आहे.