मुंबई : 8 ऑक्टोबर 2023 | मुंबई प्रवेशाच्या पाचही टोलनाक्यांवर दरवाढीच्या मुद्द्यावरुन मनसेनं सरकारवर टीका केलीय. मनसे नेते अविनाश जाधव दरवाढी विरोधात उपोषणाला बसले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. विशेष म्हणजे यावर बोलताना राज्याच्या कोणत्याही टोलनाक्यांवर खासगी चार चाकी वाहनांना टोल लागत नसल्याचा अजब दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय.
राज्यातल्या काही नाक्यांवर खासगी चारचाकी वाहनांना टोलमुक्ती आहे. मात्र. इतर अनेक टोलनाक्यांवर चारचाकी गाडीलाही टोल लागतो, हे वास्तव आहे. 2015 मध्ये फडणवीसांचे सरकार असताना काही टोल नाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमुक्ती देण्यात आली आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र, ठराविक टोल नाक्यावर ही टोलमुक्ती आहे, राज्यात इतर टोलनाक्यावर सर्वच वाहनांकडून टोल वसूल केला जातो. त्यामुळे टोलवर केलेला खर्च आणि झालेली वसुली प्रशासनाने जाहीर केली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केलीय.
दहिसर टोल नाका, मुलुंडचा आनंद नगर टोल नाका, मुलुंड-ठाणे मार्गावरील टोलनाका, ठाणे- ऐरोली टोल नाका आणि सायन-पनवेल टोलनाका या पाचही टोलनाक्यांवर सरकारनं दरवाढ केलीय. मात्र, टोलच्या निमित्तानं मनसे पुन्हा सक्रीय झालीय. मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था, मराठी पाट्या, मराठी लोकांना नाकारली जाणारी घरं यानंतर मनसेनं पुन्हा एकदा टोलदरवाढीचा मुद्दा हाती घेतलाय.
अविनाश जाधव यांच्या उपोषणानंतर राज ठकारे आक्रमक झालेत. अशा कारणामुळे माझा माणूस वाया जाऊ देणार नाही अशी टीका त्यांनी सरकारवर केलीय. एकनाथ शिंदे यांची टोलवरून जी याचिका दाखल केली होती. ती कुणाच्या सांगण्यावरून मागे घेतली असा थेट सवाल त्यांनी केलाय.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राज्यात चार चाकी वाहनांकडून टोल घेतला जात नसल्याचं सांगितलं. यावरून सुप्रिया सुळे यांनी मलाही टोल भरावा लागतो, असा सांगत प्रशासकीय कारभारावर बोट ठेवलंय. टोलच्या संदर्भात शासनाची मानसिकता आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि शिंदे साहेबांची मानसिकता पाहिली तर टोलमुक्ती व्हावी या दिशेने आहे. परंतु सरकार चालवत असताना आणि रस्ते उभा करत असताना शेवटी आर्थिक गणित पण आहे.