नाशिकः मुंबई-पुणे नंतर आता नाशिकमध्ये सुद्धा आयटी हब होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून, आयटी हब उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधांसाठी 20 कोटी रुपये मंजूर केले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर जानेवारीमध्ये या प्रकल्पाच्या उद्घाटनाचा नारळ फोडण्यात येणार आहे.
दीड हजार एकरावर प्रकल्प
नाशिकच्या आडगाव परिसरात अंदाजे दीड हजार एकर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. येत्या जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे. या पार्कमुळे यावर आधारित असलेल्या लोकांना, नाशिकमधील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. सोबतच ज्या मुलांना आयटी हबसाठी मुंबई, पुणे, बंगळुरूला जावे लागायचे त्यांच्यासाठी हा आयटी हब म्हणजे स्वतः चालून आलेली संधी ठरेल. या आयटी हबमुळे स्थानिक नागरिकांना रोजगार आणि नाशिकच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आडगावच्या जागेला विरोध
आयटी पार्क ज्या भागात उभारले जात आहे. त्या भागात केवळ बिल्डरांच्या जमिनी असून या आयटी पार्कसाठी ज्या सुविधा उभारल्या जातील, त्यातून केवळ त्या भागातील बिल्डरांच्या जमिनीचा भाव वाढून त्याचा फायदा केवळ बिल्डरांना होईल, असा आरोप होत आहे. विशेषतः आयटी हबचा विषय महासभेत आणण्यापूर्वी आर्थिक देवाणघेवाण झाली असून आपण या विरोधात अँटी करप्शन विभागाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा भाजपाच्याच नगरसेवकांनी यापूर्वी दिला आहे. शिवाय विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रावादीच्या नगरसेवकांनी देखील होऊ घातल्या IT हब उभारणीची प्रक्रिया संशयास्पद असल्याचा आरोप करत प्रक्रियेला विरोध यापूर्वीच केला आहे. शहरात अनेक जागा असून त्या इतर जागा सोडून एकाच जागेची निवड या हबसाठी का केली गेली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
निवडणुकीपूर्वी बार
नाशिकमध्ये यापूर्वी फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिका निवडणुका झाल्या. त्यावेळी महापालिकेच्या एकूण 122 जागांपैकी 67 जागा भाजपने खिशात घातल्या. त्यानंतर शिवसेनेने 34 जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले. काँग्रेस 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले, तर कधीकाळी 39 जागा मिळवून सत्तेत असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पानिपत होऊन त्यांना फक्त 5 जागा मिळाल्या. आता फेब्रुवारी महिन्यात होणारी नाशिक महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्यात येत आहे. या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपने महापालिकेत नोकर भरतीचा बार उडवून दिला आहे. सोबतच आयटी हब आणि लॉजिसस्टिक पार्कसाठीही जागा निश्चित करण्यात आली आहे.
Nashik | हे भलतेच अवघड, नाशिकमध्ये चक्क 156 अधिकाऱ्यांची नावे मतदार यादीत दुबार, आता बोला…