खेमचंद कुमावत, चाळीसगाव, जळगाव, दि. 27 नोव्हेंबर 2023 | उत्तर महाराष्ट्रात २४ तासांत दोन मोठे अपघात झाले. दोन्ही अपघात धार्मिक कार्यक्रमावरुन परत येत असताना झाले. नाशिकमध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधील कन्नड घाटात अपघात झाला. रात्रीचा अंधार आणि धुक्याचा अंदाज न आल्यामुळे झालेल्या या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात सात जण जखमी झाले आहे. दोन्ही अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घाटात झालेला हा अपघात अत्यंत भीषण होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावच्या कन्नड घाटात रविवारी रात्री अपघात झाला. रात्रीच्या अंधारात हा भीषण अपघात झाला आहे. धुक्याचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि तवेरा गाडी दरीत कोसळली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच सात जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रविवारी संध्याकाळी नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ अनकवाडे रेल्वे उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात रविवारी संध्याकाळी अपघात झाला. या अपघातात रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे आणि प्रतीक नाईक हे पाचही तरुण ठार झाले. सर्व जण मनमाड जवळच्या म्हसोबा देवस्थान येथील धार्मिक कार्यक्रमाला गेले होते. त्यानंतर अक्कलकोट येथून दर्शन घेऊन येणाऱ्या तवेरा गाडीचा रविवारी रात्री दोन वाजता अपघात झाला. हे सर्व जण मालेगावकडे प्रवास करत होते. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. सात जण जखमी झाले आहे. या जखमींना रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.