जळगाव | 19 मार्च 2024 : कधीकाळी भारतीय जनता पक्षाचे कणखर नेतृत्व असलेले एकनाथ खडसे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये गेल्यावर ते भाजपवर सातत्याने टीका करत असतात. जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची एकमेकांवर टीका पातळी सोडून अनेकवेळा झाली. आता लोकसभा निवडणुकीत खडसे घराण्यातील उमेदवार जाहीर झाल्या. एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे भाजपच्या रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवार आहेत. त्यानंतर रावेरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार देणार असल्याचे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांनी भाजपवर टीका केली होती. त्या टीकेला भाजप जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.
जळगाव जिल्ह्यात भाजपला कुत्र विचारत नव्हतं, त्यावेळी मी राजकारणात भाजपला जिल्ह्यात मजबूत केले, असे वक्तव्य काल एकनाथ खडसे यांनी केले होते. खडसे यांच्या या वक्तव्यावरून भाजप जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर यांनी एकनाथ खडसे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहेत.
ज्या भाजप विषयी तुम्ही बोलतात त्याच भाजपने तुम्हाला बारा खात्याचे मंत्री केले. भाजपने तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद दिले. भाजपने तुमच्या मुलीला जिल्हा बँकेचा अध्यक्षपद दिले. भाजपनेच तुमच्या पत्नीला जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष पद दिले. एवढा असतानाही तुम्ही भाजपला कुत्रही विचारात नव्हता, असे म्हणत असाल तर याच म्हणण्याप्रमाणे आज तुमची परिस्थिती झाली आहे. या शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर यांनी एकनाथ खडसेवर निशाणा साधला आहे.
बेताल वक्तव्यासाठी एकनाथ खडसे सध्या प्रसिद्ध आहेत. यापुढे बोलताना वयाचे भान ठेवून वक्तव्य करा, असा टोला सुद्धा भाजप जिल्हाध्यक्ष यांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे. भाजप सोडल्यानंतर तुमचीच परिस्थिती तुम्ही जसं बोलले कुत्र विचारत नाही, त्याप्रमाणे झाली आहे, असे ज्ञानेश्वर जळकेकर यांनी म्हटले आहे.