भाजपकडून शिवसेना उबाठाला अनेक धक्के दिले जात आहेत. उद्धव ठाकरे यांची साथ सोडत काही जण शिवसेनेत तर काही जण भाजपमध्ये जात आहेत. परंतु आता उद्धव ठाकरे यांची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत भाजपचा जळगाव येथील विद्यमान खासदार जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपने तिकीट कापल्यानंतर नाराज असलेले खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात जाणार आहेत. ठाकरे गटाकडून उन्मेष पाटील यांच्या पत्नीस जळगाव लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली जाणार आहे. त्या जळगावमधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपने या ठिकाणी स्मिता वाघ यांना तिकीट दिले आहे.
उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील जळगाव लोकसभेसाठी उमेदवार असणार आहे. भाजप विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून त्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपने तिकीट कापल्याने विद्यमान खासदार उन्मेष पाटील नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या पहिल्या सतरा जणांच्या उमेदवारी यादीत जळगाव लोकसभेतून उमेदवारीबाबत सस्पेन्स ठेवला गेला आहे. त्या ठिकाणी संपदा पाटील उमेदवार असू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भाजप खासदार उन्मेष पाटील व संपदा पाटील शिवसेना ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्मेष पाटील हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसणार आहे. संपदा पाटील ठाकरे गटाकडून रिंगणात उतरल्यास दोन प्रमुख महिला उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. भाजप म्हणजे महायुतीच्या स्मिता वाघ आणि महाविकास आघाडीच्या संपदा पाटील यांच्यात लढत होईल.
उन्मेष पाटील यांच्या या भूमिकेमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारण बदलणार आहे. उन्मेष पाटील चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 20219 मध्ये त्यांना जळगाव लोकसभा मतदार संघाचे तिकीट दिले. त्यावेळी ते विजयी झाले.