मुंबई | राज्यावर सध्या लोडशेडिंगचं (Load shedding) संकट घोंगावत आहे. मात्र या स्थितीला सामोरं जाणारं महाराष्ट्र काही एकमेव राज्य नसून प्रत्येक ठिकाणीच ही स्थिती आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज दिली. जळगावमध्ये पत्रकार परिषदेत आज ते बोलत होते. तसेच राज्यातील वीजटंचाईवर लवकरात लवकर उपाय शोधून काढणार असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत नुकतीच एक बैठकदेखील पार पडली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. जळगावमध्ये आज शरद पवार यांनी मनसेचा भोंग्यांबाबतचा आग्रह, केंद्रीय तपास यंत्रणांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधातील वापर, तसेच त्यांच्यावर केलेल्या जातीवादाच्या आरोपांवर स्पष्टपणे प्रतिक्रिया नोंदवली.
वीजसंकटामुळे लोडशेडिंगला सामोरे जाऊ शकते, यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, ‘ तुमचे जे सहकारी अन्य राज्यातील आहेत, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र या सर्व राज्यांची माहिती घ्या. सर्व भारतात वीज टंचाई आहे. भाजपच्या प्रत्येक राज्यात आहे. कोळश्यामुळे आणि इतर कारणांनी वीज टंचाई आहे. त्याचे परिणाम सर्व सामान्यांना सहन करावे लागत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री हे त्यावर गांभीर्याने पाहत आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल बैठक घेतली आणि नवीन पर्याय शोधत आहे. काही अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली आहे. दोन तीन दिवसात या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी काय उपाययोजना करावी हे मुख्यमंत्र्यांना सांगितलं जाईल. ते या प्रश्नावर गंभीर आहेत.
हनुमान जयंतीला मनसेकडून अनेक मंदिरांमध्ये भोंगे वाटप करण्यात येणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, ‘असा राजकारणी एखादी व्यक्ती टोकाची भूमिका घेऊन जात असेल त्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष समर्थन देण्याची भूमिका घेणं ही काळजी करण्यासारखं आहे. या सर्व कार्यक्रमात समाजातील सामाजिक ऐक्य संकटात येईल का याची चिंता वाटते. काही झालं तरी महाराष्ट्र एकसंध झाला पाहिजे. सर्वात सामंजस्य असलं पाहिजे. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यापासून आपण बाजूला जातोय ही काळजी करण्याची गोष्ट आहे.
इतर बातम्या-