जळगाव : जळगावात भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यामधल्या वादानं पातळी सोडलीय. राजकीय आरोप-प्रत्यारोप कौटुंबिक पातळीपर्यंत गेले आहेत. दोन्ही नेते एकमेकांच्या कुटुंबियांवरुन एकमेकांवर टीका करु लागले आहेत. जळगावात खडसे-महाजन वाद दिवसेंदिवस पातळी सोडत चाललाय. राजकीय आरोप-प्रत्यारोप एकमेकांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचू लागले आहेत. वाद सुरु झाला घराणेशाहीच्या राजकारणावरुन.
एकनाथ खडसेंना सर्व पद घरातच हवीत, असा आरोप गिरीश महाजनांनी केला होता. त्यावर एकनाथ खडसेंनी महाजनांच्या घराणेशाहीचा दाखल देत बरं झाला महाजनांना मुलगा नाही, असं विधान केलं. आणि खडसेंच्या या टीकेला उत्तर देताना महाजनांनी खडसेंच्या मुलाची आत्महत्या झाली की हत्या? हा प्रश्न करुन खडसेंना डिवचलं.
गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंच्या मुलाच्या मृत्यूबाबत प्रश्न उभे केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर तुमच्याकडे तपास यंत्रणा असून हवी ती चौकशी करुन घेण्याचं आव्हान खडसेंनी महाजनांना दिलंय.
महाजन आणि खडसेंमधला वाद नवा नाही. याआधी सुद्धा दोघांमधल्या शाब्दिक टीकांनी पातळी सोडली होती.
एकनाथ खडसेंना निखील नावाचा एकुलता एक मुलगा होता. निखील खडसे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांनी काही काळ भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्षपदही भूषवलं. मात्र वयाच्या 35 व्या वर्षी निखील खडसेंनी गोळी झाडून स्वतःचं आयुष्य संपवलं.
राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरुच राहतात. आजचे शत्रू उद्या मित्रही होतात. मात्र उत्तर-प्रत्युत्तरांच्या खेळात दोन्ही बाजूनं कुटुंब येता कामा नये.