जळगाव : इर्शाळवाडी हे गाव डोंगराच्या पायथ्याशी आहे. दुर्घटनेत या गावातील अनेक घर मातीच्या ढिगार्याखाली गाडली गेली आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. हे गाव दुर्गम भागात असल्यामुळे त्या ठिकाणी बचावकार्यात अडचणी येत आहेत. जेसीबी, ट्रॅक्टरसारखी मशिनरी त्या ठिकाणी पोहचू शकत नाही. त्यामुळे हातानेच कुदळ पावळ्याने माती कोरून मृतदेह शोधावे लागत आहेत. आता पुढच्या दोन ते तीन दिवसात मातीच्या ढिगार्याखाली दबलेले मृतदेह कुजतील. त्यामुळे मृतदेहांचं शोधकार्य थांबवावे लागेल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात दिली. आतापर्यंत या दुर्घटनेत फक्त 22 ते 24 लोकांचे मृतदेह हाती आले आहेत. मृतांचा आकडा हा दुर्दैवाने तीन आकडी असू शकतो, अशी भीतीही त्यांनी वर्तवली. रायगड जिल्ह्यातील तळीये या ठिकाणी ज्याप्रमाणे काही दिवसांनी मृतदेहांचं शोधकार्य थांबवून पंचनामे करण्यात आले होते. त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील करावं लागेल, असेही गिरीश महाजन म्हणाले.
अजित पवार यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावणे हा आततायीपणा आहे. असं कुणीही करू नये, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे कान उपटले आहेत. जळगावात राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले आहेत. त्यावर गिरीश महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिली.
भाजपकडून असं केलं जातंय. आता राष्ट्रवादीकडून असं सुरू आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच 2024 च्या निवडणुका लढवल्या जातील, असं देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलंय. त्यामुळे असा प्रकार कोणीही करू नये, असंही गिरीश महाजन म्हणाले.
इर्शाळवाडी हे गाव दरड प्रवण क्षेत्रात नव्हतं. तरी त्या ठिकाणी एवढी मोठी दुर्घटना घडली, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. पावसाळा सुरू असल्याने आता कोकणात दरडी कोसळतील. त्यामुळे सरकारने उपाययोजना करायला हव्यात, असे मत राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मांडलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केलंय.
दरम्यान यावेळी गिरीश महाजन यांनी अमित ठाकरे यांचाही चिमटा काढला. सरकार आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर इर्शाळवाडीची घटना टळली असती, अशी टीका अमित ठाकरे यांनी केली होती. त्यालाही गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं. इतकं बालीश स्टेटमेंट कुणी करू नये. हा निसर्गाचा कोप आहे. त्यामुळे या लोकांबद्दल काय बोलावं. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. किमान त्यात तरी राजकारण आणू नका, अशा शब्दात त्यांनी अमित ठाकरे यांना फटकारले.