जळगाव : कांदा हे पीक फार काळ टिकवून ठेवता येत नाही. त्यामुळे याचे भाव कमी-जास्त होत असतात. पण, विशिष्ट जातीचे कांदे हे जास्त काळ टिकून राहतात. त्यामुळे या कांद्याला विशेष मागणी असते. भुसावळ भागातील या कांद्याला खास मागणी आहे. त्याचे कारण म्हणजे हा कांदा जास्त काळ टिकून राहतो. वर्षभर टिकून राहत असल्याने या कांद्याला परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एकीकडं कांद्याचे भाव कमी असताना दुसरीकडे चांगल्या आणि टिकाऊ कांद्याला मागणी नक्कीच आहे.
भुसावळ तालुक्यातील कांद्याला राज्याबाहेर मोठ्या प्रमाणात मागणी असते. यामुळे भुसावळ महसूल मंडळातील चार मंडळांमध्ये ३०२ हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. पुनरी कांदा या महिन्यातील काढण्यास सुरुवात होईल. या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. ती मुख्य म्हणजे वर्षभर हा कांदा साठवून ठेवला तरी खराब होत नाही. त्यामुळे या कांद्याला पश्चिम बंगाल भागामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते.
भुसावळ तालुक्यातील भुसावळ, कुन्हा पानाचे वरणगाव, पिंपळगाव खुर्द ही चार महसूल मंडळ आहे. या महसूल मंडळांमध्ये भुसावळ २ हेक्टर, कुन्हा पानाचे ४० हेक्टर, वरणगाव १७६ हेक्टर पिंपळगाव खुर्द ८४ हेक्टर असे एकूण ३०२ हेक्टरची कांद्याची लागवड करण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वाधिक कमी लागवड ही भुसावळ या मंडल क्षेत्रामध्ये झालेली आहे.
तालुक्यातील साकरी, वेल्हाळा, वरणगाव या भागात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात येते. या भागातील लालसर कांदा व्यापारी थेट शेताच्या बांधावरून माल हा पश्चिम बंगालच्या मार्केटमध्ये घेऊन जात असतात. सध्याला बाजारात विक्रीला आलेला कांदा हा चाळीस किलोची गोणी २२० रुपयांपासून तर ३०० रुपयांपर्यंत कांदा विक्री होतो, तर किरकोळमध्ये ७ रुपयांपासून ते १० आहे.
या कांद्यामुळे उत्पादकांना चार पैसे चांगले मिळत आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक खूश आहेत. हा कांदा चांगला आणि टिकाऊ असल्याने बाजारातही चांगली मागणी आहे.