जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसलाय. एकनाथ खडसेंच्या सहकार पॅनलचा दारुण पराभव झालाय. धक्कादायक गोष्ट म्हणजे एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदीकिनी खडसेही या निवडणुकीत पराभूत झाल्यात. पाहुयात यावरचाच हा खास रिपोर्ट. जळगाव दूध संघावर भाजप-शिंदे गटाने एकहाती वर्चस्व मिळवलंय. शेतकरी विकास पॅनलचा 20 पैकी 16 जागांवर दणदणीत विजय झालाय. तर एकनाथ खडसेंच्या सहकार पॅनलला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावं लागलंय. एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचीही दारुण पराभव झालाय.
या निकालानंतर विकासावर खोके भारी पडल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिलीय. तर त्यांच्या या आरोपांनंतर मंत्री शंभूराज देसाई यांनीही खडसेंवर निशाणा साधलाय.
जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत अनेक दिग्गज रिंगणात होते. यात शेतकरी विकास पॅनलकडून मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील, भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि संजय सावकारे रिंगणात होते.
तर सहकार पॅनलकडून एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे या रिंगणात होत्या. मात्र या निवडणुकीत मंदाकिनी खडसेंचा तब्बल 76 मतांनी पराभव झालाय.
मंदाकिनी खडसेंच्या पराभवानंतर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी समर्थकांसह एकच जल्लोष केला. फटाक्याची आतजबाजी करत स्वतः आमदारांनी डीजेवर ठेका धरला.
दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटलांनीही खडसेंवर निशाणा साधलाय.
निवडणुकीत खडसे गटाचा पराभव झाला खरा. पण पुढच्या निवडणुकीत या पराभवाचा नक्की वचपा काढू, असा निर्धार खडसेंनी केलाय. त्यामुळे येत्या काळात खडसे पराभवाचा वचपा कसा काढणार? हे आता पाहावं लागेल.