‘स्मिता वाघ यांचं तिकीट मीच नाकारलं होतं’, गिरीश महाजन यांची कबुली, खडसेंवरही साधला निशाणा

| Updated on: Jun 23, 2024 | 8:20 PM

जळगावात भाजपच्या वतीने आज जळगाव लोकसभा मतदारसंघाची समीक्षा बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी भाषणातून वेगवेगळ्या मुद्द्यांवर लक्ष वेधले. विशेष म्हणजे त्यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला.

स्मिता वाघ यांचं तिकीट मीच नाकारलं होतं, गिरीश महाजन यांची कबुली, खडसेंवरही साधला निशाणा
स्मिता वाघ आणि गिरीश महाजन
Follow us on

“2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी स्मिता वाघ यांचं तिकीट मीच नाकारलं होतं. त्यावेळी मला विजयाबाबत थोडी शंका होती. माझ्याच सांगण्यावरून स्मिता वाघ यांचं तिकीट कापण्यात आलं होतं”, अशी कबुली मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीय. जळगावच्या भाजपच्या समीक्षा बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात याबाबत कबुली दिली आहे. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपमधून ठाकरे गटात गेलेले माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर निशाणा साधला. “ज्यांना तिकीट मिळालं त्यांना तब्बल पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून आणलं. मात्र यावेळी उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते दुसऱ्या पक्षात गेले आणि मित्राचा बळीचा बकरा केला. काय झालं? अनेक जण म्हणत होते. मात्र या निवडणुकीत अनेक लोकांचा माज उतरला”, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

“उद्या मंत्री गिरीश महाजन जरी पक्षातून गेला तरी फरक पडणार नाही. आम्ही मोठे आहोत ते पक्षाचा भरोशावर आहोत. भाजप पक्ष सोडल्यानंतर सगळ्यांना सगळ्यांची जागा दिसलेली आहे. मी मी म्हणणारे मी म्हणणारे आता कसे बसले आहेत. मी मी म्हणणाऱ्यांची काय अवस्था झाली आहे हे सर्वांनी बघितलं आहे. मात्र यांच्यावर बोलून मला आता तोंडही खराब करायचं नाही”, असं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी नाव न घेता आमदार एकनाथ खडसेंना जोरदार टोला लगावला. “यावेळी जळगाव जिल्ह्यात पूर्ण विधानसभेच्या जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकू, याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाही. गेल्या वेळी आपल्या दोन जागा कमी आल्या. कारण आपलेच घरभेदी होते. त्यामुळेच ते घडलं”, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी खडसेंवर निशाणा साधला.

‘संकटमोचक लोक उगाच म्हणत नाही’

“खतरो के खिलाडी या पद्धतीने देवाची परवा न करता काम करायचं”, असं गिरीश महाजन म्हणाले. “इर्शालवाडी, अनेक घटनांमधला अनुभव मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितला. अशा पद्धतीने काम केलं तरंच लोक आपल्याला अॅप्रिसिएट करतात आणि म्हणतात नेता पाहिजे तर असा. त्यामुळे आपल्याला संकटमोचक लोक उगाच म्हणत नाही”, असं म्हणत स्वतःला संकटमोचक सांगण्यामागची व्याख्या मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केली.

महाजनांचा पहिल्या विधानसभा निवडणुकीचा किस्सा

“माझी पहिलीच विधानसभा निवडणूक होती आणि माझ्या विरोधात शरद पवार यांचे उजवे हात ईश्वरलाल जैन उभे होते. त्यावेळी प्रमोद महाजन यांनी मला निवडणूक लढायचं सांगितलं. मी त्यांना म्हटलं मी नाही लढत. मात्र त्यांनी म्हटलं की तुला लढावं लागेल आणि तू जिंकणार सुद्धा. मी त्यांना सांगितलं, माझ्या खिशात पाच हजार रुपये नाहीत. कसे निवडणूक लढू? त्यावेळी मला प्रमोद महाजन म्हणाले की, तू काही कर. वर्गणी गोळा कर..भिख माग… त्यावेळी पाच साडेपाच लाख रुपये वर्गणी गोळा झाली. मी निवडणूक लढलो आणि मी पहिलीच निवडणूक 14 हजार मतांनी निवडून आलो. तेव्हापासून आजपर्यंत कधी मागे वळून पाहिलं नाही”, अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीचा किस्सा सांगितला.