जळगावः भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची मुलगी श्रेया यांचा विवाह (Marriage) सोहळा आज जामनेर येथे पार पडतोय. या लग्न समारंभाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आकर्षक सजावट आणि रोषणाईने परिसर उजळून निघालाय. महाजन यांच्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसह राज्यातील अनेक मंत्री हजेरी लावणार आहेत. त्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे, भारती पवार, रावसाहेब दानवे, भागवत कऱ्हाड, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गुलाबराव पाटील, भाजप नेत्या पंकजा मुंडे, अमृता फडणवीस यांच्यासह अनेक नेते आणि मंत्रीही उपस्थित राहणार असल्याचे समजते. थोड्याच वेळात या विवाह सोहळ्याला सुरुवात होणार आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. हजारो वऱ्हाडी जामनेर येथील विवाह सोहळ्याच्या स्थळी पोहचले आहेत.
14 एकरावर सोहळा
गिरीश महाजन यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यासाठी तब्बल 14 एकरावर मंडप आणि शामियाना उभारला आहे. राज्यभरातील सुमारे एक लाख पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. हे ध्यानात घेऊन लग्नाची जंगी तयारी करण्यात आली आहे. या लग्नाचा हळदी सोहळाही उत्साहात झाला. यावेळी जिल्ह्यातील अनेक आमदारांसह मान्यवरांची उपस्थिती होती. गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी आपल्या कन्येला हळद लावून माता पित्याचे कर्तव्य बजावले.
कोण आहेत जावई?
गिरीश महाजन यांचे होणारे जावई अक्षय अजय गुजर हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील असून आयटी इंजिनीयर आहेत. त्यांचा कुठल्याही राजकीय घराण्याशी कुठली संबंध नसून ते फूड इंडस्ट्रीचे मालक आहे. या भव्य शाही विवाह सोहळ्यासाठी राज्यातील दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत. विवाह सोहळ्यासाठी जामनेर येथील हिवरखेडा रोडवर चौदा एकरमध्ये भव्य शाही मंडप उभारण्यात आला आहे. गिरीश महाजन यांच्या कन्येच्या लग्नासाठी मंडप सजला आहे. हजारो लोकांच्या भोजन व्यवस्थेसह पार्किंगची सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली आहे.