“मला दहावीत 36 टक्के, बारावीत 2 विषय नापास झालो, ‘त्याचं’ दु:ख आजही”, गिरीश महाजन यांनी व्यक्त केली खंत

| Updated on: Jul 26, 2024 | 1:08 AM

"मला दहावीत 36 टक्के, बारावीत 2 विषय नापास झालो. असं कसंतरी रडत कुढत पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र नोकरी लागली नाही, त्याचं दुःख मला आजही आहे", अशी खंत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

मला दहावीत 36 टक्के, बारावीत 2 विषय नापास झालो, त्याचं दु:ख आजही, गिरीश महाजन यांनी व्यक्त केली खंत
भाजप नेते गिरीश महाजन
Follow us on

किशोर पाटील, Tv9 मराठी प्रतिनिधी, जळगाव : राज्यात गाजत असलेलं वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकणावर अप्रत्यक्षरीत्या बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी परीक्षेत होणाऱ्या घोटाळ्यांवर भाष्य केलं. “ग्रामविकास खात्याच्या 19 हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. ती महिनाभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याही पदासाठी परीक्षा घेणं हे पहिले इतकं सोपं राहिलेलं नाही. परीक्षांमध्ये आता खूप गडबडी व्हायला लागली आहे. परीक्षा घेणं ताप झालेला आहे. मग आता युपीएससी परीक्षांमध्ये सुद्धा आता घोळ होत असल्याचे समोर येत आहे. या परीक्षा सुद्धा आता क्रॅक व्हायला लागले आहेत. मोबाईलमुळे हा सर्व ताप झाला आहे. मोबाईल वरून कोणी प्रश्नपत्रिका बाहेर पाठवतो, कोणी बाहेरून उत्तर पत्रिका आतमध्ये पाठवतो, अशा पद्धतीने सगळ्या गडबडी होतात. यावर मी आता फारस बोलणार नाही”, असं गिरीश महाजन म्हणाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तलाठी जिल्हा परिषद अभियंता तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या तरुणांना गुरुवारी (25 जुलै) मंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं. यावेळी गिरीश महाजनांनी चांगलीच फटकेबाजी केली.

“एकदा नोकऱ्या निघत नाहीत. निघाल्या तर मग आमच्याकडे नुसतं 19 हजार जागांसाठी, 12 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले. बारा लाख विद्यार्थी परीक्षेला? काय बोलावे कळत नाही. एवढ्या लोकांचे पैसे घेताना तिथे व्यवस्था करताना आमचे इतक्या नाकी नऊ आलं. माझे वडील सुद्धा शिक्षक. मी अभ्यासामध्ये खूप मागे होतो. पण खेळात पुढे होतो. हे सोडून नोकरी लागली पाहिजे, अशी वडिलांची इच्छा होती. पण माझा ट्रॅक चुकला. मला दहावीत 36 टक्के, बारावीत 2 विषय नापास झालो. असं कसंतरी रडत कुढत पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र नोकरी लागली नाही, त्याचं दुःख मला आजही आहे. पण आज मी वैद्यकीय शिक्षण मंत्री होतो आणि बाहेरील देशामधील तज्ज्ञ डॉक्टरांना मार्गदर्शन केलं, अशी गंमतीशीर लोकशाही आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले,

‘आता खूप प्रॉब्लेम झालाय’

“विधानसभेत मी सिनियर आमदार आहे. आम्हाला दर पाच वर्ष परीक्षा द्यावी लागते. त्यासाठी खूप अभ्यास पण करावा लागतो. तुम्ही दहा काम करा, पण एक काम केलं नाही तर कार्यकर्ते पक्ष बदलतात. आता पूर्वीसारखा राहिलं नाही. खूप प्रॉब्लेम झाला आहे. आता इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे. कार्यकर्ते पक्ष बदलतात. मित्र सुद्धा आता इकडून तिकडे जातात. त्यामुळे आम्हाला सुद्धा पाच वर्ष खूप मेहनत घ्यावी लागते. कार्यकर्त्यांना खूप सांभाळावं लागत आणि आम्ही आमच्या परीक्षेमध्ये नापास झालो तर डायरेक्ट घरी”, अशी फटकेबाजी गिरीश महाजन यांनी केली.

गिरीश महाजन यांचा मिश्किल टोला

“मी सहा वेळा, गुलाबराव पाटील चार वेळा मंत्री झाले. अनिल पाटील पहिल्यांदा. याप्रमने खूप परिश्रम करावे लागतात. पण आम्हाला सध्या कुणी कंटाळलेले नाही. या दोन वर्षांमध्ये माझी तीन, चार, पाच वेळा खाती बदलली. म्हणजे इन्कमिंग वाढलं की खात बदललं”,असा मिश्किल टोला गिरीश महाजन यांनी लगावला. “माझ्याकडे तीन-चार खाती होती. त्यानंतर पुन्हा सरकार आले, खाती बदलली. मग अजित दादा आले. माझे वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा खातं तिकडे चाललं गेलं. आता नवीन पर्यटन आणि ग्रामविकास हे मोठं खातं आलं. पण जे खातं मिळालं ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत”, असं गिरीश महाजन म्हणाले.