जळगाव | 31 जुलै 2023 : “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात जेव्हाही लढायचे असेल तेव्हा समविचारी पक्षांसोबत लढू”, असं भाजप आमदार मंगेश चव्हाण म्हणाले. “खडसे या विषयाचे ऑडीट होणार, ते जनतेसमोर येणार, याशिवाय याला पूर्णविराम नाही”, अशा शब्दांमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांनी आज पुन्हा एकदा मुक्ताईनगरमध्ये येवून एकनाथ खडसे यांना आव्हान दिलंय. मुक्ताईनगरच्या नगराध्यक्ष नजमा तडवी यांनी नगराध्यक्षपदाचा पुन्हा कार्यभार सांभाळल्यानंतर मंगेश चव्हाण पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांना इशारा दिला. नजमा तडवी या भाजपच्या नगराध्यक्षा आहेत. दोन वर्षांपूर्वी जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेवर न दाखल केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरवलं होतं. पण राज्य सरकारने अपात्रतेच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
“जात पडताळणी सर्टिफिकेटच्या आधारे त्यांना काही लोकांनी सर्टिफिकेट वेळेवर न मिळू देणं, त्याआधारे अपात्र करणे हा हेतू ठेवून काही लोकांनी कट कारस्थान केलं होतं असं मला वाटतं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला 8 नोव्हेंबर 2021 चा निर्णय हा तात्पुरता स्वरुपात आपण स्थगित केला”, अशी प्रतिक्रिया मंगेश चव्हाण यांनी दिली.
“ज्या लोकांनी पक्ष सोडला ते लोकं आपल्यासोबत यायला तयार नाहीत म्हणून त्यांना अपात्र करायचं. एका आदिवासी महिलेवर हा एकप्रकारचा अन्याय होता. हा अन्याय दूर करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करुन हा निर्णय घेण्यास त्यांना आज भाग पाडलं. आज खऱ्या अर्थाने 9 ऑगस्ट आदिवासी दिवस जवळ येतोय. एका आदिवासी महिलेला न्याय मिळवून देता आला याचा आनंद होतोय”, असं चव्हाण म्हणाले.
“एकनाथ खडसे यांचा या सगळ्या प्रकरणात कागदावर जरी रोल दिसत नसला तरी जात पडताळणी सर्टिफिकेट न मिळू देणं, त्याविरोधात कोर्टात अपील दाखल करणे, या सगळ्या प्रक्रियेचा कळीचा नारद कोण होता? सूत्रधार कोण होता? हे सगळं जनतेला माहिती आहे”, अशी टीका मंगेश चव्हाण यांनी केली.
“कागदावर गिरीश चौधरी नावाचे व्यक्ती दिसत होते तरी ते कोण, कुणाच्या जवळचे, कुणाचे समर्थक, त्यांना नजमा तडवी या पायउतार व्हावं असं का वाटलं? हे एकच मी आणि माझा परिवार अशी हुकूमशाही मिरवणाऱ्या एका नेत्याला चपराक आहे. त्या नेत्याने ज्या पद्धतीने वाटचाल केलीय आज त्यांची काय अवस्था होतेय ते आपण सर्वजण पाहतोय. आता ऑडिट सुरु झालंय. मी एकदा कमिटमेंट केलं तर मी स्वत:चं सुद्धा एकत नाही. खडसे या विषयाचं ऑडिट होणार ते जनतेसमोर येणार, याशिवाय या विषयाला पूर्णविराम नाही”, असा इशारा मंगेश चव्हाण यांनी दिला.
“जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिली आहे. एका आदिवासी महिलेवर अन्याय व्हायला नको. तिचं म्हणणं ऐकून घ्यावं यासाठी 7 ऑगस्टला मंत्रालयात सुनावणी ठेवली आहे. जिल्हाधिकारी त्या सुनावणीला हजर राहणार आहेत. मेरीटच्या आधारावर तो निर्णय होईलच, पण ही महिला खुर्चीवर बसली म्हणू काही लोकांना अस्वस्थ वाटत होतं. ते पुन्हा हायकोर्टात जात आहेत, असं मला समजलं”, असं चव्हाण म्हणाले.
“ते कोर्टात जरी गेले तरी त्यांना शुभेच्छा. कोर्टात जाणे, लोकांना अडचणीत आणणे हे उपद्व्याप त्यांचे अनेक वर्षांपासून चालले आहेत. ते आमच्यासाठी नवीन नाही. ते त्यांना लख लाभो. न्यायलय काय निर्णय घ्यायचा ते घेईल. पण जनतेच्या मनातून निवडून आलेल्या नजमा ताई आज पुन्हा त्या खुर्चीवर बसल्या. त्यांना बसवण्यामध्ये भाजपचा आमचा हातभार लागला याचा आम्हाला आनंद आहे”, अशी प्रतिक्रिया मंगेश चव्हाण यांनी दिली.