निवडणुकीत भाजपा खासदाराने भाजपा आमदारालाच हरवलं

| Updated on: Jan 09, 2023 | 9:18 PM

स्मृती पॅनलने विकास पॅनलचा दारुण पराभव केला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच सहकार क्षेत्रातल्या निवडणुकीत भाजप पक्षाचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला.

निवडणुकीत भाजपा खासदाराने भाजपा आमदारालाच हरवलं
Follow us on

खेमचंद कुमावत, Tv9 मराठी, जळगाव : चाळीसगावातील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत भाजपचेच आमदार आणि खासदार आमनेसामने आलेले बघायला मिळाले. विशेष म्हणजे या निवडणुकीच्या दरम्यान जागेवरुन वाद पेटला. अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. या दरम्यान खासदार उन्मेश पाटील यांचा माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासोबत फोनवरील संभाषणाचा ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाला. या सगळ्या घडामोडी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडत होत्या. अखेर ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून खासदार उन्मेश पाटील गटाचा एकतर्फी विजय झालाय.

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत भाजप खासदार उन्मेश पाटील गटाचा एकतर्फी विजय झालाय. या विजयानंतर खासदार उन्मेश पाटील समर्थकांनी ठेका धरला.

एकाच पक्षाच्या आमदार-खासदाराच्या लढाईत खासदार गटाचा विजय झाला. स्मृती पॅनलकडून भाजप खासदार उन्मेश पाटील तर विकास पॅनलकडून भाजप आमदार मंगेश चव्हाण हे आमने-सामने आले होते.

हे सुद्धा वाचा

स्मृती पॅनलने विकास पॅनलचा दारुण पराभव केला आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच सहकार क्षेत्रातल्या निवडणुकीत भाजप पक्षाचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता.

गेल्या आठवड्यात भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी माजी मंत्री सुरेश जैन यांना फोन करुन जाब विचारला होता. माजी मंत्री सुरेश जैन यांच्याशी संवाद साधलेले ऑडिओ क्लिप खासदारांच्या अधिकृत सोशल अकाउंटवरून व्हायरल करण्यात आले होते. कारण नसताना आमदार मंगेश चव्हाण मला प्रकरणात इन्व्हॉल करताय, असा आरोप भाजप खासदारांनी केला होता.

“आमदार मंगेश चव्हाण यांनी मी आणि ते सोबत येऊन तुमच्याशी व्यवहार केला, असा व्हिडिओ तुमच्याकडून तयार केला आहे. मी आणि मंगेश चव्हाण आपल्याकडे व्यवहारासाठी एकत्र कधीही आलो नाही. असा आपण लवकरात लवकर खुलासा करा, अन्यथा मी पत्रकार परिषद घेईल”, असा इशारा खासदार उन्मेश पाटील यांनी फोनवरुन सुरेश जैन यांना दिला होता.