अपक्ष उमेदवार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, निकालाच्या एक दिवस आधीच जळगावात मोठा राडा

| Updated on: Nov 22, 2024 | 9:07 PM

जळगावातील पिंप्राळामध्ये अपक्ष उमेदवार कुलभूषण पाटील आणि भाजपचे माजी नगरसेवक अतुल बारी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.

अपक्ष उमेदवार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, निकालाच्या एक दिवस आधीच जळगावात मोठा राडा
अपक्ष उमेदवार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, निकालाच्या एक दिवस आधीच जळगावात मोठा राडा
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या निकालाआधीच जळगावात वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. जळगावातील पिंप्राळामध्ये अपक्ष उमेदवार कुलभूषण पाटील आणि भाजपचे माजी नगरसेवक अतुल बारी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे कुलभूषण पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीवरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचं रुपांतर मोठ्या वादात झालं आणि या वादाचं पर्यावसन मारहाणीत झालं. या हाणामारीत दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी जमाव पांगवला आहे. भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी घटनास्थळ गाठून भाजप कार्यकर्त्यांची चर्चा करत माहिती जाणून घेतली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अद्याप कोणाची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. याप्रकरणी तक्रार न आल्यास पोलीस सुमोटो गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, मतमोजणीच्या आदल्या दिवशी झालेल्या राड्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्राच्या पुढच्या पाच वर्षांचं भवितव्य उद्या ठरणार

दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा उद्या महानिकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्यावर सर्वसामान्य जनतेची भूमिका काय आहे, ते उद्या स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं होतं. पण लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात शिंदे सरकारने लाडकी बहीण सारखी महत्त्वकांक्षी योजना लागू केली. त्यामुळे या योजनेचा महायुतीला कितपत फायदा झाला? ते उद्या स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे फोडाफोडीच्या राजकारणावर जनतेची प्रतिक्रिया नेमकी काय आहे? ते उद्या स्पष्ट होणार आहे.

हे सुद्धा वाचा

विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून आतापासूनच आकड्यांची जुळवाजुळव सुरु करण्यात आल्याची माहिती आहे. ज्या ठिकाणी अपक्ष किंवा बंडखोर जिंकून येतील अशा ठिकाणी त्यांच्यासोबत संपर्क केला जात असल्याची माहिती आहे. तर महायुतीच्या गोटातही बैठक सत्र सुरु आहे. असं असताना निकाल काय लागतो ते उद्या स्पष्ट होणार आहे. उद्याच्या निकालावर महाराष्ट्राच्या राजकारणाचं पुढील पाच वर्षांचं भवितव्य ठरणार आहे.