जळगावच्या तळेगावात कंटेनरने 5 वर्षाच्या चिमुकल्याला चिरडले, तणाव इतका वाढला की मुख्यमंत्र्यांचा दौरा सोडून पोलीस….

| Updated on: Aug 13, 2024 | 3:27 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चाळीगावमधील तळेगावात एक दुर्दैवी घटना घडली. एका कंटेनरने 5 वर्षाच्या चिमुकल्याला चिरडलं आहे. त्यामुळे गावकरी संतापले आहेत. या घटनेनंतर तणाव इतका वाढला की, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी तैनात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा दौरा सोडून तळेगावला जावं लागलं आहे.

जळगावच्या तळेगावात कंटेनरने 5 वर्षाच्या चिमुकल्याला चिरडले, तणाव इतका वाढला की मुख्यमंत्र्यांचा दौरा सोडून पोलीस....
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

खेमचंद कुमावत, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पण त्यांच्या दौऱ्यादरम्यानच एक दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. या घटनेनंतर संबंधित गावात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासाठी बंदोबस्ताला असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंग देशमुख यांना आपला दौरा सोडून संबंधित गावात जावं लागलं आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा दौरा सोडून संबंधित गावात जावं लागल्यामुळे त्या गावात परिस्थिती कशी असू शकते, याचा अंदाज आपल्याला लावता येऊ शकतो. पोलीस संबंधित परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम युद्ध पातळीवर करत आहेत.

जळगावच्या चाळीसगांव तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावरील तळगाव गावाजवळ भरधाव कंटेनरने एका पाच वर्षाच्या चिमुकल्याला चिरडलं. या अपघातात पाच वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात संतापाची लाट पसरली आहे. घटनेनंतर गावातील संतप्त जमावाने कंटेनरची तोडफोड करत कंटेनर पेटवून दिला. तसेच संतप्त गावकऱ्यांनी चाळीसगाव-नांदगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.

संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गावातील परिस्थिती नियंत्रणात आणली. पण पाच वर्षीय चिमुकल्याचा या घटनेत मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. तर काही जण प्रचंड संतापले आहेत. तळेगावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे. रस्त्यावर गतिरोधक टाकून, अवजड वाहतूक गावातून बंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

दरम्यान, तळेगावात घटनेनंतर आता पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंग देशमुख मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात बंदोबस्ताला असताना, त्यांना ताबडतोब मुख्यमंत्र्यांचा दौरा सोडून तळेगावमध्ये दाखल व्हावं लागलं आहे.