किशोर पाटील, Tv9 मराठी, जळगाव | 24 ऑक्टोबर 2023 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला दसरा सण हा सर्वत्र देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी सोनं खरेदी केलं तर घरात कायम बरकत राहते, अशी नागरिकांची भावना असते. त्यामुळे आजचा दसरा सणाचा मुहूर्त साधण्याकरता जळगावच्या सुवर्णनगरीत सकाळपासूनच सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
गेल्या महिन्यात 57 हजार रुपयांपर्यंत सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसानंतर सोन्याच्या दरात तब्बल चार हजार रुपयांनी वाढ झालीय. सोन्याचे भाव हे 61 हजार रुपयांपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, ग्राहकांचा बजेट कोलमडला आहे. मात्र आज दसरा सण आहे. दसरा सणाला सोने खरेदीला विशेष महत्त्व असल्यामुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांनी सकाळपासूनच सराफ बाजारातील दुकानांमध्ये गर्दी केल्याचं चित्र दिसून आले.
दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर सोने व्यवसायिकांकडूनही वेगवेगळ्या प्रकारचे दागिने हे ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात ग्राहकांचे विशेष आकर्षण असलेला सोन्याचं आपट्याचे पान हे सुद्धा प्रत्येक वजनामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी मात्र सकाळपासूनच आज दसरा सण असल्यामुळे ग्राहकांचा सोने खरेदीसाठी ओघ पाहायला मिळत आहे. दिवसभर ग्राहकांच्या गर्दीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केलीय. तर दुसरीकडे सोन्याच्या दरात जरी वाढ झाली असली तरी मात्र आजचा सोने खरेदीचा जो मुहूर्त आहे तो मुहूर्त साधण्याकरता थोडे फार का होईना, सोने खरेदीसाठी दुकानात आलो आहोत, अशा प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या.