शुकशुकाट! जळगावच्या प्रसिद्ध सुवर्णनगरीकडे ग्राहकांनी अचानक फिरवली पाठ, नेमकं कारण काय?

| Updated on: Dec 26, 2023 | 7:41 PM

जळगावची सुवर्णनगरी देशभरात प्रसिद्ध असताना या सराफ बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे सराफ बाजावार मंदीची सावट बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे सध्या सणवार सुरु आहेत, नवीन वर्षाला सुरुवात होत आहे, याशिवाय लग्न सराईतचा धुमधडाका सुरु आहे. असं असताना जळगावच्या सराफ बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं बघायला मिळत आहे.

शुकशुकाट! जळगावच्या प्रसिद्ध सुवर्णनगरीकडे ग्राहकांनी अचानक फिरवली पाठ, नेमकं कारण काय?
Follow us on

किशोर पाटील, Tv9 मराठी, जळगाव | 26 डिसेंबर 2023 : जळगावची सुवर्णनगरी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. या सुवर्ण नगरीत फक्त राज्यभरातील नव्हे तर देशभरातून ग्राहक येत असतात. भारतात सोन्या-चांदीच्या दागिन्यांना विशेष महत्त्व आहे. सणासुदीच्या दिवशी नागरीक अनेकदा सोने खरेदी करतात. काही जण गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करतात. तर काही जण सोने-चांदीचे दागिने आवड म्हणून खरेदी करतात. तर काही जणांचा लग्नाचा बस्ता या सुवर्ण नगरीत फाडला जातो. जळगावच्या सुवर्ण नगरीत लग्नासाठी सोने-चांदी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी असते. विशेष म्हणजे सध्या लग्न सराईतचे दिवस सुरु झाले आहेत. याशिवाय सध्या सणासुदीचे दिवसही आहेत. पण असं असताना सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी अचानक जळगावच्या सुवर्ण नगरीकडे पाठ फिरवली आहे.

जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढउतार असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात 62 हजार रुपयांवर असलेले सोन्याचे दर या आठवड्यात 63 हजार रुपयांवर पोहचले आहे. आठवडाभरात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाल्यामुळे सोने आणि चांदी खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे लग्न सराईचे दिवस असतानाही जळगावच्या सराफाच्या दुकानांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तसेच जळगावच्या सुवर्णनगरीत मंदीचे सावट पसरले आहे.

सोन्याच्या दरात एकाच दिवसात 600 रुपयांनी वाढ

जळगावात सराफ बाजारात सोन्याच्या दरात एकाच दिवसात 600 रुपयांनी वाढ झाली आहे, तर चांदीचे दर सुद्धा 1 हजार रुपयांनी वधारले आहेत. सोन्याचे आजचे दर हे प्रती तोळा 63 हजार 200 रुपये तर चांदीचे दर हे 76 हजार रुपये एवढे आहेत. गेल्या आठवड्यात 62 हजार रुपये असलेल्या सोन्याच्या दरात एक हजारांनी वाढ झाल्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. जळगावच्या सराफ दुकानांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

शेअर बाजारात होत असलेली चढ उतार, सोन्यामध्ये वाढलेली गुंतवणूक, या कारणांमुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं सोने व्यवसायिकांचं म्हणणं आहे. सोन्याच्या दारात झालेल्या भाववाढीमुळे ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे लग्न सराईतचे दिवस असतानाही सोने बाजारात मंदी पसरली असल्याचे सोने व्यवसायिकांचं म्हणणं आहे.