पोषण आहाराच्या पाकिटात निघालं मेलेल्या उंदराचं पिल्लू, गर्भवती महिला आणि बालकांच्या जीवाशी खेळ?

| Updated on: Jul 22, 2024 | 8:48 PM

राज्य शासनावर सर्वसामान्य जनता ही डोळे झाकून विश्वास ठेवते. प्रशासनाकडून आपल्याला सर्वोत्तम सुविधा दिल्या जातात, अशी भावना नागरिकांमध्ये असते. त्यामुळे राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सर्वच गोष्टी चांगल्या असतात असं आपण धरुन चालतो. पण लहान बालकांना शाळा किंवा अंगणवाडीतून मिळणारा पोषण आहार त्यास अपवाद आहे. कारण पोषण आहारात कधी साप आढळतो तर कधी विद्यार्थ्यांना विषबाधा होते. आता पुन्हा तशीच घटना समोर आली आहे. जळगावात पोषण आहारात चक्क मेलेल्या उंदराचं पिल्लू आढळलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोषण आहाराच्या पाकिटात निघालं मेलेल्या उंदराचं पिल्लू, गर्भवती महिला आणि बालकांच्या जीवाशी खेळ?
पोषण आहाराच्या पाकिटात निघालं मेलेल्या उंदराचं पिल्लू
Follow us on

किशोर पाटील, Tv9 मराठी प्रतिनिधी, जळगाव : राज्य शासनाकडून गर्भवती माता आणि बालकांना पोषण आहार दिला जातो. पण राज्यातील अंगणवाडी आणि शाळांमधून दिला जाणारा पोषण आहार हा खरंच पोषण आहार आहे की विष आहे? असा प्रश्न निर्माण व्हावा अशा घटना समोर येताना दिसत आहेत. पोषण आहार या शब्दाचा अर्थ म्हणजे पोषक आहार किंवा संतुलित आहार. हा आहार सामान्य आरोग्य आणि कल्याणास प्रोत्साहन देतो, असं मानलं जातं. पण हा पोषण आहार गर्भवती माता आणि बालकांसाठी किती सुरक्षित आहे? असा प्रश्न निर्माण होतोय. विशेष म्हणजे असा प्रश्न निर्माण व्हावा, अशी पहिली घटना नाही. याआधीदेखील अनेकदा अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. तरीदेखील झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नसल्याचं स्पष्ट होतंय. कारण आता जळगावात पोषण आहाराशी संबंधित एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.

सांगलीत काही दिवसांपूर्वी पोषण आहारात मेलेला साप सापडल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती. तसेच वर्षभरापूर्वी पुण्यातील एका शाळेत पोषण आहारातून 60 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली होती. पण या घटनांमधूनही प्रशासन झोपेतून जागी होताना दिसत नाही. जळगावात पुन्हा एकदा तसाच प्रकार बघायला मिळाला आहे. जळगावात पोषण आहाराच्या पाकिटात चक्क मेलेलं उदाराचं पिल्लू आढळलं आहे. त्यामुळे या पोषण आहारावर आता पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

जळगावच्या नशिराबाद येथे अंगणवाडीतून पोषण आहाराच्या पाकिटात मेलेलं उंदराचे पिल्लू सापडलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अंगणवाडी पोषण आहाराच्या मिक्स तांदुळाच्या पाकिटात मेलेल्या उंदराचं पिल्लू आढळल्याने खळबळ उडाली आहे. तेजस्वी देवरे या गृहिणीच्या स्वयंपाकादरम्यान हा धक्कादायक प्रकार लक्षात आला. पोषण आहाराच्या पाकिटामध्ये उंदीर सापडल्याने प्रशासनाचा अनागोंदी कारभार पुन्हा उघडकीस आला आहे. बालकांच्या जीवाशी खेळ होत असल्याने नागरिकांसह गृहिणींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

या प्रकरणी आता काय कारवाई होते? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. संबंधित प्रकरण तापलं तर या प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली जाऊ शकते किंवा एखाद्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. पण तशी कारवाई होते की नाही? याची देखील शाश्वती नाही. विशेष म्हणजे असे संतापजनक प्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाकडून आणखी काही प्रयत्न का केले जात नाहीत? असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय.