भाजपच्या पक्षप्रवेशावर आमदार एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा नवीन खुलासे केले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत आपला भाजपात प्रवेश झाला आहे. पण आपल्या अधिकृत प्रवेशाला महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा विरोध आहे, असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांचा आपल्या पक्षप्रवेशाला विरोध असल्याचं स्पष्ट केलं आहे. एकनाथ खडसे यांनी आता थेट नाव घेतल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे यांनी नुकतंच दोन दिवसांपूर्वी भाजपमधील पक्षप्रवेशाबाबत उद्विग्नता व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा माध्यमांना प्रतिक्रिया देत भाजपला इशारा दिला आहे.
“मी सभ्रमावस्थेत आहे मी आधीच सांगितलं आहे. भाजपने मला प्रवेश देऊनही तो जाहीर केलेला नाही. त्यामुळे भाजपला माझी आवश्यकता नाही, असं वाटत आहे. मी काही अडचणींमुळे भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या अडचणी अजून आहेत. तसं आश्वासन मला भाजपकडून देण्यात आलं होतं. मात्र भाजपला तर माझी गरज नाही. तर माझा मूळ पक्ष काय वाईट आहे. मी आमदार आहे. आणखी चार वर्षे आमदार आहे”, अशी भूमिका एकनाथ खडसे यांनी मांडली
“भाजपने मला घेतले नाही तर मी राष्ट्रवादीत जाईन. जाईन म्हणजे मी राष्ट्रवादीचा सदस्य आहे. मी राष्ट्रवादी पक्ष सोडलेला नाही. भाजपमधल्या काही लोकांनी मला प्रवेशा संदर्भात संपर्क केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा हस्ते माझा प्रवेश झालेला आहे आणि याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन विरोध करत असतील तर मला असं वाटतं जे. पी नड्डा यांच्यापेक्षा गिरीश महाजन आणि फडणवीस पक्षामध्ये मोठे असावेत”, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला.
एकनाथ खडसे यांनी नुकतीच ‘टीव्ही 9 मराठी’ला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी भाजप प्रवेशाबद्दल उद्विग्नता व्यक्त केली होती. तुम्हाला भाजपकडून काहीतरी मोठी जबाबदारी मिळणार आहे ते खरं आहे का? असा प्रश्न खडसेंना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी खंत व्यक्त केली होती. “मोठी जबाबदारी मिळेल त्यावेळेस खरं, अशी माझी भूमिका आहे. त्याबाबत कुठलीही सूचना मला आलेली नाही. किंबहुना भाजपमध्ये प्रवेशाबाबत निर्णय झाला नाही तर पुढच्या मोठ्या जबाबदारीचा विचार काय करत बसायचा? आज मला भाजपमध्ये प्रवेश करायचा तर चार महिने वाट धरावी लागते. यापेक्षा मला असं वाटतं की आपलं आपलं घरी बसावं आणि आपलं काम करावं. चार महिने झाले. तुम्हाला मी चार महिन्यात ही पहिली मुलाखत देत आहे. चार महिन्यात मी कुणाला टीव्हीवर मुलाखत दिली नाही. कारण वाद नको”, अशी भूमिका एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली होती.