तेव्हापासून राज्यात किळसवानं राजकारण सुरू, एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप

| Updated on: Jul 13, 2023 | 8:12 PM

जनतेलाही आता या किळसवान्या राजकारणाचा कंटाळा आलाय, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं.

तेव्हापासून राज्यात किळसवानं राजकारण सुरू, एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
Follow us on

जळगाव : 2014 नंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले. तेव्हापासून किळसवानं राजकारण राज्यात सुरू आहे. माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत मी इतकं घाणेरडं आणि किळसवानं राजकारण कधीही पाहिलं नव्हतं. आज सुडाचं राजकारण सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना छळलं जात आहे. हा वाईट अनुभव फक्त मला आलेला नाही. तर अनेकांना हा वाईट अनुभव आलेला आहे. जनतेलाही आता या किळसवान्या राजकारणाचा कंटाळा आलाय, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं.

देवेंद्र फडणवीस यांची अनेकांशी भावनिक युती झालेली आहे. राजकारण हे राजकारण आहे. राजकारणात अनेकदा आवश्यकतेनुसार कोणाशी युत्या कराव्या लागतात. कोणाबरोबर जावं लागतं, असं फडणवीस म्हणालेत. फडणवीस हे देखील म्हणाले आहेत की, आम्ही आवश्यकता भासल्यास काँग्रेस आणि एमआयएम सोडून कोणाबरोबरही जायला तयार आहोत.

फडणवीस हे सोयीचं राजकारण करतात

म्हणजे हे उद्या कोणासोबतही जातील. वायएसआरसोबत जातील. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन पक्षासोबत जातील. ज्यांनी एकमेकांसोबत कायम विरोध केला त्या राष्ट्रवादीसोबतही ते गेले. वेळ पडल्यास ज्याप्रमाणे काश्मीरमध्ये मुक्ती मेहबूबा यांच्यासोबत ते गेले होते. तसेच ते उद्या एमआयएम सोबतही जातील. म्हणजेच फडणवीस हे सोयीचं राजकारण करतात, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.

अजित पवार यांना निर्णय घेणे अवघड जाणार

अजित पवार हे यापूर्वी देखील सरकारमध्ये होते आणि आताही सरकारमध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील ते काही काळ उपमुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत. कोण व्यक्ती मंत्रिमंडळात येतो. त्यापेक्षा त्या व्यक्तीने किती काम केलेले आहे हे महत्त्वाचं असतं. अजित पवार हे धडाडीने काम करणारे, शब्दाला पक्के राहणारे नेते आहेत, असं त्यांचं व्यक्तिमत्व असल्याचं सांगितलं जातं. पण आता तिघांचं राजकारण आहे. तिन्ही पक्षांचे मंत्री सरकारमध्ये आहेत. त्यामुळे अजित पवारांना एकट्याने निर्णय घेणे अवघड जाईल.