राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आता पुन्हा स्वगृही भाजपात प्रवेश करणार आहेत. खडसे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीवारी केल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर त्यांनी आपले भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत चांगले संबंध असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या सातत्याने चर्चा सुरु होत्या. या चर्चांनंतर आज अखेर एकनाथ खडसे यांनी या चर्चांवर मोठा खुलासा केला आहे. मी भाजपात प्रवेश करणार आहे, अशी कबुली एकनाथ खडसे यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत भावनिक वक्तव्य केलं. मी शरद पवार यांचा ऋणी राहीन. त्यांनी मला संकटकाळात मदत केली. येत्या 15 दिवसात दिल्लीत भाजपात प्रवेश करणार, असं एकनाथ खडसे म्हणाले.
“भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मी भेट घेतली. भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. येत्या 15 दिवसांच्या आत हा प्रवेश व्हावा, अशा स्वरुपाचा माझा प्रयत्न आहे. चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही. माझा भाजपप्रवेश हा दिल्लीला होणार आहे. दिल्लीला केंद्रीय नेतृत्वाकडून मला ज्यादिवशी बोलवणं येईल त्याचदिवशी माझा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल”, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.
“भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता. पण भाजपमध्ये जुने कार्यकर्ते आणि नेत्यांशी चर्चा करत असताना तुम्ही पक्षात परत आले पाहिजे. तुम्ही परत आले तर बरं होईल, अशी चर्चा आमची आणि वरिष्ठांमध्ये होती. हे काय आजचं नव्हतं. चार ते सहा महिन्यांपासून त्यांनी अशाप्रकारची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून चर्चा सुरु होती”, असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला.
“भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणमध्ये माझं योगदान राहीलं आहे. गेले अनेक वर्ष मी या घरामध्ये राहिलो आहे. चाळीस-बेचाळीस वर्ष ज्या भाजपमध्ये मी राहिलो त्यामुळे माझा लगाव जाण्याचा होता. काही कारणासाठी माझी नाराजी झाली. त्यामुळे मी या पक्षातून बाहेर पडलो होतो. माझ्या नाराजीची तीव्रता कमी झाली म्हणून मी माझ्या पक्षात जातोय”, असं स्पष्टीकरण एकनाथ खडसेंनी दिलं.
“माझ्या पक्षप्रवेशाने कोणाचीही नाराजी नाही मी सर्वांना घेऊन चालणारा आहे. माझ्याविषयी कोणाची नाराजी असेल तर मी ते दूर करण्याचा प्रयत्न करेन. माझी नाराजी कमी झाली. त्यामुळे मी हा निर्णय घेतला. मला तुरुंगात टाकण्याचा कुठलाही धाक माझ्या मनात नव्हता. मी जामीनावर आहे. त्यामुळे मला पर्मनंट जामीन मिळाला आहे. त्यामुळे केस चालत राहील आणि मला कोणी उठून जेलमध्ये टाकेल, अशी परिस्थिती आज तरी नाही. मी या संदर्भात निश्चित आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.