जळगाव : राज्याचे कृषीमंत्री आणि मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे खळबळ उडाली आहे. सत्तारांच्या विधानामुळे राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सत्तारांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे देखील संतापले आहेत. त्यांनी सत्तारांच्या विधानाचा निषेध व्यक्त केलाय. सत्तारांना संस्कार नाहीत. त्यांना आई-वडिलांनी शिकवलं नाही, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी सत्तारांवर निशाणा साधला.
“अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा मी विरोध करतो. हा संस्कराचा परिणाम आहे. आई-वडिलांनी ज्याला शिकवले नाही तो अशा रीतीने बोलू शकतो”, असा घणाघात एकनाथ खडसेंनी केला.
“एका महिलेचा केलेला हा अपमान संतापजनक आहे. याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. आपले शब्द मागे घेतले पाहिजेत”, अशी भूमिका एकनाथ खडसे यांनी मांडली.
राज्यभरात राष्ट्रवादी आक्रमक
दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तर थेट सत्तारांच्या बंगल्याबाहेर येत आंदोलन केलं.
यावेळी कार्यकर्ते इतके आक्रमक झाले होते की त्यांनी सत्तारांच्या बंगल्याच्या काचा फोडल्या. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. आंदोलक तेथून हटण्यास तयार नव्हते.
अब्दूल सत्तार यांनी माफी मागावी. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केलं. तसेच सत्तारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, या सगळ्या गदारोळावर खासदार सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. खरंतर सुप्रिया यांनी सत्तारांच्या टीकेवर बोलणंच टाळलेलं नाही. “मला अब्दुल सत्तार यांच्यावर काहीच बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलीय.