‘मी लपून-छपून भाजपात जाणार नाही, पवारांच्या संमतीने जाईन’, खडसेंचं सर्वात मोठं वक्तव्य

| Updated on: Mar 12, 2024 | 7:40 PM

"रक्षाताईने मला कधी भाजपमध्ये यावं असं सांगितलं नाही. मला भाजपमध्ये यावं असं आवाहन करावं एवढी मोठी रक्षाताई अजून झालेली नाही. माझे सरळ नड्डाजी यांच्याशी संबंध आहेत. हे मी कधी लपवून ठेवलेलं नाही. शरद पवार यांनासुद्धा ते माहीत आहे", असं एकनाथ खडसे म्हणाले?

मी लपून-छपून भाजपात जाणार नाही, पवारांच्या संमतीने जाईन, खडसेंचं सर्वात मोठं वक्तव्य
eknath khadse
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव | 12 मार्च 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर आज अखेर मौन सोडलं आहे. “भाजपमध्ये जाण्याचं कुठलंही मेजर कारण नाही आणि माझी इच्छाही नाही. मात्र केव्हाही जाईल त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कळवेल. शरद पवार यांच्या संमतीने जाईल. मी लपून-छपून जाणार नाही. ज्यावेळी जाईन तेव्हा उघडपणे जाईन. पण शरद पवार यांच्या सल्ल्याने जाईन”, असं मोठं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. एकनाथ खडसे यांनी आपल्या आयुष्यातील 40 वर्षांपेक्षा जास्त काळ भाजप पक्षासोबत काम करण्यात घालवला आहे. पण काही वर्षांपूर्वी त्यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला तेव्हा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप आणि टीका केली होती. असं असलं तरी ते आता पुन्हा भाजपात जाण्यास इच्छुक असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यावर त्यांनी आज भूमिका मांडली.

“या प्रश्नाचे उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही. भाजपमध्ये मला जायचं असेल तर यांच्या (मंत्री गिरीश महाजन) यांच्या परवानगीची गरज नाही. मी 40-42 वर्ष भाजपमध्ये होतो. त्यामुळे यांच्यापेक्षा (मंत्री गिरीश महाजन) वरिष्ठांशी माझे चांगले संबंध आहेत आणि आजही आहेत. पक्षाच्या तत्त्वाशी मतभेद असू शकतात मात्र व्यक्ती म्हणून मी काही कोणाशी मारामाऱ्या केलेल्या नाहीत”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

‘माझ्या भेटीगाठी होत असतात’

“पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महासचिव विनोद तावडे, मंत्री राजनाथ सिंह यांना मी कधी भेटलो नाही, असंही नाही. रक्षाताई खडसे या माझ्या घरात खासदार आहेत. त्यामुळे यांच्याशी माझ्या भेटीगाठी होत असतात. ते स्वाभाविक आहे. पाच वर्षांच्या आमदारकी सोडून जाणं, एवढं काही मेजर कारण आता नाही”, असं खडसे म्हणाले.

‘माझी इच्छा होईल तेव्हा मी शरद पवारांना कळवेल’

“ईडी फिडी असं काही आता नाही. जेव्हा होतं तेव्हा जायला होतं. मला नोटीस आल्या. माझ्या जमिनी जमा झाल्या आहेत. त्यामुळे आजही जायला हवं होतं. त्यांनी मला किती छळलं, अशा स्थितीत रवींद्र वायकरांसारखं मला जायला काही हरकत नव्हती. पण माझी मनापासून भाजपमध्ये जाण्याची इच्छा नाही आणि जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा मी शरद पवारांना कळवेल”, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं.

‘माझे सरळ नड्डाजी यांच्याशी संबंध’

“रक्षाताईने मला कधी भाजपमध्ये यावं असं सांगितलं नाही. मला भाजपमध्ये यावं असं आवाहन करावं एवढी मोठी रक्षाताई अजून झालेली नाही. माझे सरळ नड्डाजी यांच्याशी संबंध आहेत. हे मी कधी लपवून ठेवलेलं नाही. शरद पवार यांनासुद्धा ते माहीत आहे. शरद पवार यांनी मला सहा वर्षांसाठी आमदारकी अशा काळात मिळवून दिली आहे त्यावेळी मी अंधारात होतो. मी आजपर्यंत शरद पवारांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही गोष्ट केलेली नाही. आता तरी सध्या माझ्या डोक्यात असा कुठलाही विषय नाही”, असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं.