धक्कादायक! जळगावातही बनावट औषधांचा पुरवठा? रुगणांच्या जीवाशी खेळ? प्रकरण उजेडात येताच मोठी खळबळ

| Updated on: Jan 05, 2025 | 10:56 PM

जळगाव जिल्ह्यात आरोग्य विभागाने पुरवलेल्या औषधांमध्ये बनावट औषधे असल्याचे समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषदेने चौकशी समिती नेमली आहे. याप्रकरणात दोषी आढळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. औषधांचा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि दोषींवर कडक कारवाईची ग्वाही दिली आहे.

धक्कादायक! जळगावातही बनावट औषधांचा पुरवठा? रुगणांच्या जीवाशी खेळ? प्रकरण उजेडात येताच मोठी खळबळ
Follow us on

किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : राज्यात काही जिल्ह्यांत आरोग्य विभागाच्या वतीने पुरवठा केल्या गेलेल्या औषधांमध्ये काही औषधी बनावट असल्याच्या घटना समोर आल्या आहे. यानंतर जळगाव जिल्ह्यातही अशाच प्रकारे काही औषधी या बनावट असल्याची लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भोळे यांच्या तक्रारीनंतर जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने चौकशी समिती गठीत केली आहे. या चौकशीच्या अहवालात कोणी दोषी आढळून आले तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे.

जळगाव जिल्ह्यात 78 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. 442 उपकेंद्र आहेत. या सगळ्या आरोग्य केंद्रांसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने औषध पुरवठा केला जातो. या औषध पुरवठामधील काही औषधांमध्ये डाग आढळून आले. त्याच बरोबर औषधींचा भुगा आढळून आला असल्याने, सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोळे यांना या औषधींबाबत संशय आला. त्यांनी ही औषधी बनावट असल्याची लेखी तक्रार स्थानिक जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली. राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार केल्याने जिल्हा परिषदेसह आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

आरोग्य यंत्रणेमधील या बनावट औषधांचा पुरवठा पाहता हा रुग्णांच्या जिविताशी खेळ केला जात असल्याने, या औषधांच्या पुरवठा करणाऱ्या ठेकेदार अन् जिल्हा परिषदेमधील जबाबदार अशा अधिकाऱ्यांवर निलंबन किंवा बडतर्फिची कारवाई सरकारने करावी, अशी मागणी दिनेश भोळे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी काय म्हणाले?

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पुरवठा केला गेलेल्या औषधांमध्ये काही औषधं ही बनावट असल्याची तक्रार प्राप्त होताच जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने चौकशी समिती गठीत केली आहे. त्याचबरोबर ज्या औषधांबाबत संशय आहे, त्या औषधांचा वापर थांबविण्यात आला आहे. सर्व औषधांची ल्याब तपासणी केली जाणार आहे. तसेच पुरवठादारांचे पेमेंट ही रोखून धरण्यात आल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार गोडाऊनमध्ये साठवण करताना ही औषधी खराब होऊ शकले असल्याचा अंदाज असला तरी, तक्रारदाराने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीत कोणी दोषी आढळून आल्यास त्यावर दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचंही जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अंकित यांनी सांगितलं आहे.

मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले?

“जिल्हाधिकाऱ्यांना आजच सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मी देणार आहे. सगळ्या गोष्टी खपवल्या जातील. पण औषधांमध्ये जर कोणी भ्रष्टाचार करत असेल आणि रुग्णांच्या जीवाशी खेळत करत असेल तर हे मुळीच खपवले जाणार नाही. जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या आधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे”, अशी प्रतिक्रिया या प्रकरणावर बोलताना शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.