किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली. लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरुन मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेत असल्याचा आरोप शिवसेना मंत्र्यांचा होता, असा दावा केला जातोय. याबाबत शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली. “हे सर्व खोटे आहे. मी त्या कॅबिनेट बैठकीत होतो. काही विषय झालेला नाही. दोन दिवसांपूर्वी तुमच्या चॅनलवर दाखवलं की, अजितदादा आजारी आहेत. आता पुन्हा अजित पवार आणि त्यांचे आमदार नाराज आहे, असं काही नाही. विरोधकांच्या फसव्या अफवांना जनता बळी पडणार नाही. लाडकी बहीण ही त्यांना शुद्धीवर आणल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे”, असं गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात झालेल्या खडाजंगीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “अरे बाबा त्या कॅबिनेट बैठकीला मी होतो. कुठलाही वाद झालेले नाही उलट हसतखेळत कॅबिनेटची बैठक झाली”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडून 60 जागांची तयारी केली जात असल्याच्या वृत्तावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “शेवटी हा त्यांचा पक्ष आहे. त्यांनी किती जागा मागायच्या हा त्यांचा विचार आहे. या प्रक्रियेमध्ये आम्ही नाहीत. या प्रक्रियेमध्ये शिंदे साहेब आहेत, प्रक्रियेमध्ये देवेंद्र भाऊ आहेत आणि अजित दादा आहेत. ते ठरवतील आणि ठरवल्यानंतर योग्य तो तोडगा ते काढतील”, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली.
“गेल्यावेळी साधुसंत म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली नाही. शंभर कोटी रुपयांचा त्यांच्यावर आरोप होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली. कारवाई करण्याचा भाग हा तपास यंत्रणेचा भाग आहे आणि कारवाई झाली तर मग कारवाई आमच्यावरच का झाली? यापूर्वी ते जेलमध्ये जाऊन आलेले आहेत. त्यामुळे फार मोठा विषय नाहीय”, अशा शब्दांमध्ये गुलाबराव पाटील यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्या संदर्भात प्रतिक्रिया देत निशाणा साधला आहे.
आमदार एकनाथ खडसे यांच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. “लाडकी बहिणी योजनेसाठी सरकारकडे पैसे आहेत. मात्र शेतकऱ्यांसाठी नाही, सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा”, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली होती. “65 मिलिमीटर ज्या ठिकाणी पाऊस पडला असेल, त्या ठिकाणी नुकसान भरपाई देण्याचे नॉम्स आहेत. त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळेलच. पण आता काय आहे ना, कोल्हे कुई कुई जी चाललेली आहे ना, त्यांच्यामुळे हे होय आहे. या सरकारने एनडीआरएफच्या मदतीचे नॉर्म जे दोन एकरचे होते ते तीन एकरचे केले. पैसे वाढवले हे कोणी बोलत नाही. पण नुसती कोल्हे कुई करायची. निगेटिव बोलायचं आणि आपलं काम चालवायचं एवढा धंदा आहे”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.