उद्धव ठाकरे यांची सभा उधळण्यासाठी गोपनीय बैठक; शिवसेना आक्रमक होण्याचं नेमकं कारण काय..?

| Updated on: Apr 22, 2023 | 4:49 PM

शिवसेनेन सभा उधळून लावण्याचा इशारा दिला असल्याने उद्याच्या सभेकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकडे आता उद्याच्या सभेत उद्धव ठाकरे आणि नेते नेमका कुणावर निशाणा साधणार याची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

उद्धव ठाकरे यांची सभा उधळण्यासाठी गोपनीय बैठक; शिवसेना आक्रमक होण्याचं नेमकं कारण काय..?
Follow us on

जळगाव : राज्यात ज्या वेळेपासून सत्तांतर झाले आहे, तेव्हापासून ठाकरे गट आणि शिवसेना एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यावरून अनेकदा राजकीय वातावरणही तापले आहे. तर सध्या जळगावमध्ये ठाकरे गट आणि शिवसेना आमने सामने आले असून शिवसेनेने थेट उद्धव ठाकरे यांची सभा उधळून देण्याचा इशााराच दिला आहे. त्यामुळे जळगावमध्ये ठाकरे गट आणि शिवसेना असा सामना रंगला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाला इशारा देताना म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर झालेली टीका अजिबात सहन करणार नाही असे सांगत त्यांनी उद्याची उद्धव ठाकरे यांची होणारी सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे उद्या उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. ही सभा उधळून लावण्याची तयारी शिवसेनेचे कार्यकर्ते करत आहेत. यासंदर्भात नियोजन करण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक जळगावामध्ये सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिता कोल्हे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात एक शब्दही खपवून घेतला जाणार नाही, संजय राऊत जर एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील यांच्या विरोधात काही बोलले तर त्यांना जळगावातून बाहेर पडू देणार नाही असा थेट इशारा शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी दिला आहे.

उद्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत घुसणारचं असा इशाराही देण्यात आला आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व महिला जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत बैठक सुरू असून मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्याविरोधात आता ऐकून घेणार नाही असा इशारा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता जळगावमधील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.

शिवसेनेन सभा उधळून लावण्याचा इशारा दिला असल्याने उद्याच्या सभेकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकडे आता उद्याच्या सभेत उद्धव ठाकरे आणि नेते नेमका कुणावर निशाणा साधणार याची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.