पुण्यानंतर जळगावातही हिट अँड रन प्रकरणावरुन पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उभे राहत आहेत. बिल्डर आणि एका नेत्याच्या पोरानं महिलेसह तिच्या ३ मुलांना उडवलं. चार जण ठार झाले. धडक देणाऱ्या गाडीतून गांजाही जप्त झाला. मात्र १७ दिवस उलटूनही अद्याप आरोपींचे ब्लड रिपोर्ट आलेले नाहीत. जळगावचे नेतेही यावर गप्प आहेत. पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण देशभर गाजतंय. मात्र असाच प्रकार काही दिवसांपूर्वी जळगावात सुद्धा घडला होता. त्यात सुद्धा बऱ्यापैकी पुण्याच्या घटनेप्रमाणेच साम्य आहे. इथंही दुचाकीला धडक देणारे आरोपी बिल्डरचा आणि राजकारण्याचा मुलगा आहे.
राजकीय आशीर्वादामुळे पोलिसांनी कारवाईस कसूर केल्याचा आरोप होतोय. 7 मे ला ही दुर्घटना घडलीये. राणी चव्हाण नावाच्या आशा स्वयंसेविका इलेक्शन ड्युटी संपवून घरी परतत होत्या. दुचाकीवर त्यांच्यासोबत ७ आणि ४ वर्षांची दोन मुलं आणि १६ वर्षाचा एक भाचा होता.
जळगावच्या रामवाडीजवळ एका कारनं दुचाकीला धडक दिली. यात राणी चव्हाण यांच्यासह त्यांच्यासोबतच्या तिन्ही मुलांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार ज्या कारनं धडक दिली., त्यापैकी एक जण जळगावच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचा मुलगा आहे.
आणि दुसरा अभिषेक कौल नावाच्या बिल्डरचा मुलगा आहे. अपघातानंतर जमावानं कारमधल्या आरोपींना मारहाण केली. मारहाणीचं कारण देत पोलिसांनी आरोपींना मुंबईतल्या रुग्णालयात भर्ती केलं. अपघातावेळी कारचालक आणि कारमधले इतर जण दारुच्या नशेत होते.
ज्या कारनं धडक दिली त्या कारमध्ये गांजाही सापडलाय. मात्र गाडीत गांजा सापडल्याची कलमं उशिरानं लावली गेली. शिवाय पुण्याप्रमाणेच या प्रकरणातही अपघाताला १७ दिवस होऊनही अद्यापही आरोपींचा ब्लड रिपोर्ट आलेला नाही. सर्वसामान्यांनी अपघात घडल्यावर अशी दिरंगाई होते का. ब्लड रिपोर्ट यायला १७ दिवस लागतात का? पोलिसांवर नेमका दबाव कुणाचा आहे. पुण्याच्या घटनेबरोबरच जळगावकरही हाच प्रश्न विचारत आहेत.