जळगावातील फुफनगरी फाट्याजवळ डंपर-दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तरुणाचा ताबा सुटल्याने भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या डंपरला जोरदार धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात घडला. या अपघातात पंकज शंकर कोळी (वय – २६ वर्ष) आणि अमोल आनंदा कोळी (वय – २७ वर्ष) अशी दोन्ही मयत तरुणांची नावे आहेत. दोन्ही मयत तरुण हे जळगाव तालुक्यातील घार्डी या एकाच गावचे रहिवासी आहेत.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नागरिकांनी मदतकार्याला सुरुवात केली. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेतील. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच दोन्ही तरुणांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले आहे. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, अकोल्यात शिवशाही बसची मोठी दुर्घटना सुदैवाने टळली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूरवरून अकोल्याला येणाऱ्या शिवशाही बसचे ब्रेक अचानक निकामी झाले होते. यावेळी बस चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अपघात टळला. ब्रेक निकामी झाल्यानंतर चालकाने बस बंद पडलेल्या पेट्रोल पंपात घुसवल्याने मोठा अनर्थ टळला. अकोल्यातील अशोक वाटिका चौकात ही घटना घडली. बसचालक मनोज तायडे यांच्या समयसूचकतेचं लोकांकडून कौतुक होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही अपघाताची एक घटना समोर आली आहे. दोडामार्गातील साटेली-भेडशी भोमवाडी येथील कालव्यात गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे स्कॉर्पिओ गाडी थेट कालव्यात कोसळली. या अपघातात गाडीतील एका महिलेचा मृत्यू झाला. या अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेत गाडी कालव्याच्या बाहेर काढली. मात्र या गाडीतील एका महीलेचा मृत्यू झाला तर चालक किरकोळ जखमी झाला आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी कुडासे गावाच्या दिशेने जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या कॉजवेला धडकली आणि थेट कालव्यात कोसळली. यावेळी गाडीत असणाऱ्या महिलेला गंभीरपणे दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला तर चालक किरकोळ जखमी झाला.