अनिल केऱ्हाळे, जळगाव : जळगावमध्ये एका नगरसेवकाने लावलेले बॅनर सध्या चर्चेला कारण ठरत आहे. संबंधित नगरसेवकाने ‘सॉरी दादा’ अशा आशयाचे बॅनर लावून माजी आमदार सुरेश जैन यांची जाहीर माफी मागितली आहे. माजी आमदार सुरेश जैन हे राजकीय जीवनात सक्रिय असताना जळगाव महापालिकेचे नगरसेवक अनंत जोशी हे त्यांचे कट्टर विरोधक होते. मात्र, घरकुल घोटाळ्याप्रकरणी नियमित जामीन मिळाल्यानंतर सुरेश जैन जळगावात आले. त्यानंतर त्यांच्याबाबत कट्टर विरोधी भूमिका घेणाऱ्या नगरसेवकाने त्यांची जाहीर माफी मागितली. त्यामुळे शहरात विविध चर्चांना उधाण आलंय.
अनंत जोशी यांनी आपण सुरेश जैन यांची जाहीरपणे माफी का मागितली यामागचं कारण सांगितलं आहे. “बॅनर लावण्यामागचं कारण फक्त इतकं आहे की, भारतीय जनता पार्टीत असताना किंवा मनसेचा नगरसेवक असताना मी सुरेश जैन आणि त्यांच्या खान्देश विकास आघाडीवर अनेकवेळा आरोप केले आहेत. अनेक आंदोलनं केली आणि जाहीर टीका केली”, असं अनंत जोशी यांनी सांगितलं.
नगरसेवकाने माफी का मागितली?
“असा सगळा प्रवास करत असताना गेल्या दहा ते पंधरा वर्षाच्या माझ्या राजकीय प्रवासादरम्यान आज जेव्हा मी पाहतो, आजची जी परिस्थिती पाहतो तेव्हा आजचं राजकीय नेतृत्व कशापद्धतीने काम करतं याची तुलना केली तर सुरेश जैन यांचं काम खूप मोठं होतं”, असं नगरसेवक अनंत जोशी म्हणाले.
“मी जेव्हा टीका करायचो तेव्हा सगळंच योग्य होतं, असं नाही. मला आता जाणवायला लागलंय की त्यामध्ये बऱ्याच गोष्टी चुकीच्या होत्या. त्यामुळे मला त्यांची माफी मागायची होती. ती माफी मला जाहीरपणे मागायची होती”, असं अनंत जोशी यांनी सांगितलं.
“खरंतर त्यांच्यासोबत खासगीत मला बोलता आलं असतं. त्यांचे माझ्यासोबत चांगले संबंध आहेत. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. मी त्यांना आता रोज भेटतोसुद्धा. विषय तो नाहीय. मी त्यांच्यावर जाहीरपणे टीका केली होती. तर मला माफी सुद्धा जाहीरपणे मागायची होती”, अशा भावना अनंत जोशी यांनी व्यक्त केल्या.