जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून आठ दिवसांत एकूण 50 लोकांचे मृतदेह आढळले आहेत. तर जळगाव शहरात गेल्या आठ दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी 16 बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. एकूण आलेल्या 50 मृतदेहा पैकी 16 जण हे बेवारस व अनोळखी असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता गिरीश ठाकूर यांनी दिली आहे. सर्व बेवारस व्यक्तींवर मंत्री गिरीश महाजन यांच्या जी. एम. फाउंडेशन यांच्या आरोग्यदूत यांच्या टीमच्या मदतीने दपनविधी करण्यात येत आहे.
जळगावमध्ये उष्णतेची लाट
जळगाव जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. जिल्ह्यात उष्णतेची लाट सुरु आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा 45°c वर पोहचाल आहे. उष्णतेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात 25 मेपासून 3 जूनपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जमाबंदीचे आदेश दिले आहेत. तर उन्हात न फिरण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन जळगाव जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे. त्यातच शहरात आढळून आलेल्या 16 जणांमध्ये काही लोकांचा उन्हाच्या तीव्रतेमुळे, उन्हाच्या फटक्यामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज अधिष्ठाता ठाकूर यांनी वर्तविला आहे.
मृतदेह शवागारात
जिल्ह्याच्या विविध भागात आढळून आलेली हे मृतदेह पोलिसांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारात दाखल केली आहेत. या सगळ्याच मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. विविध आजारांनीग्रस्त, रोग प्रतिकार क्षमता कमी असेलली लोकांना, उन्हाचा फटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज ठाकूर यांनी वर्तविला आहे. या आठ दिवसांत एकूण 50 मृतदेह सापडले आहेत. त्यातील 16 मृतदेह हे बेवारस आहेत.
बेवारस नागरिकांसाठी निवास व्यवस्था
या सगळ्या मृतदेहावर मंत्री गिरीश महाजन यांच्या जी. एम फाऊंडेशन यांच्या माध्यमातून दफन विधी केले जाणार आहेत. त्याच बरोबर रस्त्यावर असलेल्या बेवारस नागरिकांसाठी सुरक्षित ठिकाणी निवास व्यवस्था करण्यात येणार असल्याच सांगण्यात येत आहे.