जळगाव (किशोर पाटील) : आज राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. निकालमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल अजित पवार गट दुसऱ्या स्थानावर आहे. एकूण 2359 ग्राम पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. शिवसेनेत सध्या दोन गट आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गट. या दोन गटात शिंदे गटाने बाजी मारली आहे. जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंत्री गुलाबराव पाटील यांचा करिष्मा कायम आहे. जळगाव ग्रामीणमध्ये शिंदे गटाने घवघवीत यश मिळवलय. आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालानुसार जळगाव ग्रामीणमध्ये 34 पैकी 29 ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातर्फे विजय उमेदवार सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या निकालानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केलीय. “विरोधक आहेत तरी कुठे? असा थेट सवाल करत टीका करणाऱ्या विरोधकांना आव्हान दिलं आहे”
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
“जो काम करतो, जनता त्याच्याच बाजूने असते. त्याचीच फलश्रुती म्हणजे हा निकाल आहे आणि जनता आमच्याच बाजूने असल्याचे स्पष्ट झालं आहे. आगामी निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीचा हा निकाल म्हणजे आमच्यासाठी नांदी आहे. आता तरी विरोधकांना शुद्ध यावी , टीका करण्यापेक्षा काम करावं असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.