जळगाव : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेना-भाजप सरकार जनसामान्यांचे कसे आहे हे दाखवण्यात वेगवेगळे कार्यक्रम राबवले गेले आहेत. त्यातीलच एक कार्यक्रम म्हणजे शासन आपल्या दारी. या कार्यक्रमाच्या निमित्तान सरकार आपल्या योजना, त्या लोकापर्यंत कशा पोहचल्या आहेत, त्याचा फायदा कोणाला झाला आहे यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रीही जनतेची भेटीगाठी घेऊन नागरिकांकडेच शासन जात आहे. मात्र यावरही विरोधकांकडून आता जोरदार हल्लाबोल केला जात आहे.
आता मुख्यमंत्री शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने 27 रोजी जळगाव दौरा करत आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री हे 27 तारखेला जळगाव दौऱ्यावर येत आहेत.
त्यावरून त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. एकाच ठिकाणी हा उपक्रम राबवला जात आहे. त्यामुळे शासन आपल्या दारी मात्र प्रत्यक्षात योजना कोणते आणि त्याबाबत आदेश जनतेला मिळतच नाही असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे.
एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की, आजही जनतेला रेशन मिळत नाही, रेशन कार्ड मिळत नाही, जिल्ह्यातल्या निम्म्यापेक्षा जागा शासकीय कार्यालयातल्या रिक्त आहेत. तसेच केळीच्या बागांच्या झालेले नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा बोजवाराही उडालेला आहे. तर कापसाला योग्य भाव मिळालेला नाही.
शेतकऱ्यांना बियाणे मिळालेली नाहीत, त्याच बरोबर पाण्याची भीषण टंचाईही अनेक ठिकाणी जाणवत आहे. तर दुसरीकडे स्वतः राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावात पाण्यासाठी लोक मोर्चा काढत आहेत. तसेच अनेक नागरिकांच्या अनेक समस्या आहेत, वेगवेगळे विषय आहेत ते विषय शासन आपल्या दारी या कार्यक्रमात सुटतील का? असा प्रतिसवालही त्यांनी यावेळी केला आहे.
त्यामुळे कोणत्याही जिल्ह्याचा दौरा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी निर्णय घ्यावा असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. फक्त आमच्या योजना अशा आहेत, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, हे सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात काय अंमलबजावणी झाली याचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घ्यावा असा सल्लाही त्यांनी त्यांना दिला आहे.