सार्वजनिक परिवहन सेवेतील बस ड्रायव्हरने मद्यपान करुन बस चालवण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. मागच्याच आठवड्यात मुंबईत कुर्ला येथे एका बेस्ट ड्रायव्हरने प्रचंड गर्दी असलेल्या रस्त्यावर अनेक रिक्षा, दुचाकींना धडक दिली. अनेक पादचाऱ्यांना चिरडलं. त्यात अनेकांचा मृत्यू झाला. या भयानक घटनेच्या आठवणी मनात ताज्या असताना जळगावात ड्रायव्हर हा मद्यधुंद अवस्थेत एसटी बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चालक दारुच्या नशेत असल्याचे लक्षात आल्यावर प्रवाशांनी आरडाओरड करत बस थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. जळगाव डेपोतून ही एसटी बस बाभूळगाव येथे मुक्कामी जात होती. त्यावेळी हा प्रकार घडला.
जळगाव डेपोची ही बस बाभूळगावला चाललेली. रात्री त्याच गावात ही बस थांबणार होती. 16 डिसेंबरला प्रवास सुरु झाला. पाळधीचा पुल पार केल्यानंतर ड्रायव्हर मद्यधुंद असल्याच प्रवाशांच्या लक्षात आलं. बांभोरी पुलावर थोडक्यात अपघातात टळला. पुलावर बस चालकाच स्टेअरिंगवरील नियंत्रण पूर्णपणे जर सुटलं असतं, तर मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने अनर्थ टळला. बांभोरी पुलावर ड्रायव्हरचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटत असल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. थोड्याच अंतरावर बस थांबवायला चालकाला भाग पाडले.
ड्रायव्हरची मेडीकल
सदर घटनेची माहिती मिळताच विभाग नियंत्रक भगवान जगनोर हे खासगी वाहनाने तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ते प्रवाशांशी बोलले. त्यांनी तिथे दुसऱ्या ड्रायव्हरची व्यवस्था करुन बस मार्गी लावली. मेडीकलमध्ये ड्रायव्हरने मद्यपान केल्याच निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईत शाळेच्या बसचा चालकही आढळला दारुच्या नशेत
कालच पुन्हा एकदा मुंबईत असाच प्रकार घडला. अंधेरी पूर्वेला असणाऱ्या साकीनाका येथील योगीराज श्रीकृष्ण विद्यालयाच्या शाळेच्या बसचा ड्रायव्हर आणि क्लीनर दारुच्या नशेत आढळून आले. ही खासगी बस गोराई येथे पिकनिकसाठी चालली होती. अंधेरी-कुर्ला रोडवर बस ड्रायव्हर नागमोडी बस चालवत होता. मंगळवारी सकाळी ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल महाले यांना संशय आला. त्यांनी बस थांबवली. त्यावेळी बस चालक आणि क्लीनर दोघे दारुच्या नशेत आढळून आले.