अमित शाह यांची शरद पवारांवर टीका, जयंत पाटील यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, ‘खोटे आरोप हा त्यांचा…’

| Updated on: Jul 21, 2024 | 8:47 PM

"शरद पवार यांच्याविषयी अमित शाह यांनी केलेले वक्तव्य शरद पवार यांच्यासोबत सुरुवातीला जे होते त्यांनाही लागू होतं. मात्र ते आता भाजपसोबत जाऊन बसलेले आहेत. अमित शाहा यांना हे कळलं नाही की ज्यांच्याकडे बघून त्यांनी हा आरोप केला आता ते त्यांच्यासोबतच जाऊन बसलेले आहेत", असा टोला जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.

अमित शाह यांची शरद पवारांवर टीका, जयंत पाटील यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, खोटे आरोप हा त्यांचा...
जयंत पाटील आणि अमित शाह यांचा फोटो
Follow us on

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पुण्यात भाजपच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. शरद पवार यांच्या सरकारने मराठा आरक्षण घालवण्याचं काम केलं, असा आरोप अमित शाह यांनी केला. तसेच देशाच्या राजकारणात शरद पवार हे सर्वात मोठे भ्रष्टाचाराचे सूत्रधार आहेत, असादेखील आरोप अमित शाह यांनी केला. “गृहमंत्रीच बोलत आहेत. त्यामुळे त्यांनी नीट अभ्यास करून तसेच माहिती करून बोलणं अपेक्षित आहे. शरद पवार यांच्यावर आजपर्यंत कुठलाही आरोप झालेला नाही. अशा पद्धतीने हकनाक खोटे आरोप करणे आणि भाषण करणं हा त्यांचा अजेंडा दिसतोय. देशात आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त भ्रष्टाचारी कोण आहे, याबाबतची वस्तुस्थिती जनतेला माहिती आहे”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी अमित शाह यांच्या आरोपांवर दिली. “आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने महाराष्ट्रात निवडणूक लढणार आहे”, असंदेखील जयंत पाटील यावेळी म्हणाले.

“अमित शाह यांना पूर्ण माहिती आहे. शरद पवार यांचं सरकार कधीच नव्हतं. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं सरकार होतं. त्यांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं. मात्र ते आरक्षण टिकवण्यात भाजप नेते देवेंद्र फडणीस यांचं सरकार काळात काही अडचणी आल्या. आरक्षणाबाबतीत आत्ताच्या सरकारने लोकांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या दिसत नाहीत”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

जयंत पाटील यांचा अजित पवारांना टोला

“शरद पवार यांच्याविषयी अमित शाह यांनी केलेले वक्तव्य शरद पवार यांच्यासोबत सुरुवातीला जे होते त्यांनाही लागू होतं. मात्र ते आता भाजपसोबत जाऊन बसलेले आहेत. अमित शाहा यांना हे कळलं नाही की ज्यांच्याकडे बघून त्यांनी हा आरोप केला आता ते त्यांच्यासोबतच जाऊन बसलेले आहेत”, असा टोला जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. “राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवारांचा सर्वात स्वच्छ पक्ष हा महाराष्ट्रातला आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणावरुन जयंत पाटील यांचं सरकारला आवाहन

जयंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला. “विरोधी पक्षाला कधी विश्वासात घेतलेलं नाही. आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. आता निर्णय घ्या. राज्यात आमदारांना निधी वाटप झाला. वेगवेगळे कार्यक्रम झाले तेव्हा तुम्हाला विरोधी पक्ष आठवला नाही. विरोधी पक्षनेते म्हणून आम्ही आमची भूमिका त्यांना सांगितली आहे. त्यांनी निर्णय कसा घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. कारण सरकार ते चालवत आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले.

“उगाच मोकळ्या बैठका घेण्यापेक्षा सरकारने आता निर्णय घेण्याची आमची अपेक्षा आहे. सरकार त्यांचा आहे. बहुमत त्यांच्याकडे आहे. निर्णय का घेत नाही? शेवटचं अधिवेशन संपलं. संपण्याच्या आधी सभागृहात विषय मांडला जाईल, अशी अपेक्षा होती. पण तुम्ही माडलं नाही. मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यासोबत तुम्ही ज्या चर्चा केल्या आहेत त्या चर्चा लक्षात घेऊन तुम्ही निर्णय घ्या. आम्ही आमची भूमिका यापूर्वी स्पष्ट सांगितलेली आहे. त्यामुळे आता सरकारने काय तो निर्णय घ्यावा. त्यांनी टेबलवर प्रस्ताव ठेवला पाहिजे. सरकार म्हणून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे”, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं.