तब्बल 16 गझल सादरीकरण सत्र, दोन परिसंवाद आणि…, अमळनेरमध्ये भव्य गझल संमेलनाचं आयोजन

| Updated on: Jan 03, 2024 | 5:11 PM

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या विश्व बंधूतेच्या विचारांना पुढे नेण्यासाठी, गझलकार सुरेश भट यांनी केलेल्या गझल प्रवासातील गझलकारांनी या संमेलनासाठी पुढाकार घेतलेला आहे. मराठी भाषेसह विविध बोलीभाषेत लेखन करणारे गझलकार सहभागासह लोकवर्गणीतून हे संमेलन घडवित आहेत.

तब्बल 16 गझल सादरीकरण सत्र, दोन परिसंवाद आणि..., अमळनेरमध्ये भव्य गझल संमेलनाचं आयोजन
Follow us on

जळगाव | 3 जानेवारी 2024 : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यावर्षी अमळनेरमध्ये आयोजित करण्यात आलंय. हे अधिवेशन 2 ते 4 फेब्रुवारीदरम्यान असणार आहे. या अधिवेशनाच्या आधी अमळनेरमध्ये आणखी एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. खान्देश साहित्य संघाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. खान्देश साहित्य संघाकडून यावर्षी अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे गझल प्रेमींसाठी ही मोठी पर्वणी असणार आहे. खान्देश साहित्य संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी या दोन दिवसीय अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलमाची माहिती दिली.

खान्देश साहित्य संघ आयोजित पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर संमेलनाध्यक्ष पदी गझलकार शिवाजीराव जवरे यांची निवड करण्यात आल्याची माहिती सदाशिवय सूर्यवंशी यांनी दिली. साने गुरूजी साहित्य नगरी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे 27 आणि 28 जानेवारी 2024 ला हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे.

संमेलनाध्यक्ष शिवाजीराव जवरे यांच्या लेखनात वास्तव्याची मांडणी

सातत्याने गझल लेखनातून आणि प्रत्यक्ष जगण्यातून गझलेची अनुभूती कित्येक नवोदित गझलकारांना देणारे संमेलन अध्यक्ष व्हावे, अशी सर्व साहित्यिक गझलकारांची इच्छा होती. त्यामुळे खान्देश साहित्य संघाच्या वतीने पहिल्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बुलढाणा येथील जेष्ठ गझलकार शिवाजी जवरे यांची निवड करण्यात येत आहे. गझलकार शिवाजी जवरे आपल्या गझल लेखनातून सामाजिक वास्तव मांडणी करतात.

शिवाजी जवरेंची कवी, गझलकार, लेखक, व्यंगचित्रकार, पक्षीमित्र आणि विविध भाषा अभ्यासक म्हणून ओळख आहे. त्यांची दोन गझलप्रधान काव्यसंग्रह, गझलसंबंधी अन्य दोन पुस्तके प्रकाशित असून विदर्भाची संघर्षयात्रा हा चरित्रग्रंथ, किशोर गीत (बालगीत संग्रह), उर्दू शिका हे उर्दू शिकण्यास उपयुक्त पुस्तक, प्रभावी सुत्रसंचालन, नोंदण-गोंदण, साईन-कोसाईन इत्यादी आठवडी सदरातील संकलनाचे लेखसंग्रह प्रकाशित आहेत.

16 गझल सादरीकरण सत्र, दोन परिसंवाद आणि गझल गायन मैफिल

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या विश्व बंधूतेच्या विचारांना पुढे नेण्यासाठी, गझलकार सुरेश भट यांनी केलेल्या गझल प्रवासातील गझलकारांनी या संमेलनासाठी पुढाकार घेतलेला आहे. मराठी भाषेसह विविध बोलीभाषेत लेखन करणारे गझलकार सहभागासह लोकवर्गणीतून हे संमेलन घडवित आहेत. साहित्य चळवळीतील हा अनोखा उपक्रम सर्वाच्या कुतूहलाचा विषय झाला आहे. दोन दिवस चालणाऱ्या या गझल संमेलनात उद्घाटन सत्र, 16 गझल सादरीकरण सत्र, दोन परिसंवाद आणि 27 जानेवारीला रात्री संमेलन स्थळी गझल गायन मैफिल देखील संपन्न होईल. तसेच मातृहृदयी साने गुरूजी साहित्य नगरी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे विविध साहित्यकृतींचे ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री उपलब्ध असेल.

फारसी, अरबी, उर्दू, हिंदी, मराठी आणि सध्या अहिराणी सारख्या बोलीभाषांमधून देखील गझल लेखनाचा प्रवास दिसून येतो. साहित्याला कोणतीच जात, धर्म, पंथ नसतो. तर साहित्य हे सामान्य माणसांच्या जगण्याचे प्रश्न मांडत असते. साहित्य चळवळीला सुसंवादी भूमिकेतून खान्देश साहित्य संघाच्या माध्यमातून या संमेलनाचे आयोजन होत आहे. अशा मैलाचा दगड ठरणाऱ्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री अनिल पाटील तर संमेलन अध्यक्ष म्हणून बुलढाणा येथील जेष्ठ गझलकार शिवाजी जवरे यांची निवड करण्यात आल्याचे खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. सदाशिव सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत संगितलं.

यावेळी खान्देश साहित्य संघाचे सचिव तथा 6 व्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रमेश बोरसे, आयोजन समिती प्रमुख हेमलता पाटील, समिती सचिव शरद धनगर, समिती उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. कुणाल पवार, राज्य ग्रंथालय महासंघाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र बोरसे, खान्देश साहित्य संघाच्या अमळनेर तालुकाध्यक्षा सुनिता पाटील, रत्नाकर पाटील, संजय पाटील, छाया इसे, शरद पाटील, रामकृष्ण बाविस्कर, दत्तात्रय सोनवणे, गोपाल हडपे, अशोक इसे, रेखाताई मराठे, उमेश काटे, वाल्मिक पाटील, रजनीताई पाटील, पूनमताई शिंदे, तेजस पाटील यांच्यासह साहित्यिक गझलकार आणि खान्देश साहित्य संघाचे विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.