जळगाव (रवी गोरे) : देशातील प्रमुख राजकीय पक्ष पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA विरुद्ध काँग्रेस प्रणीत INDIA आघाडीमध्ये मुख्य लढत आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन दोन्ही आघाड्या आपपाली मोर्चेबांधणी करत आहेत. लोकसभा निवडणुकीला आता काही महिने उरले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष कुठल्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची याचा विचार करत आहे. आपल्या राजकीय ताकदीनुसार राजकीय पक्ष त्या-त्या मतदारसंघावर दावा सांगत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट हे इंडिया आघाडीमध्ये आहेत. या तिन्ही पक्षांची लोकसभा निवडणुकीसाठीची जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहेत. जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात सर्वाधिक जागा या ठाकरे गटाला मिळू शकतात. ठाकरे गटाला 19 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 13 ते 15 जागा आणि शरद पवार गटाला 10 ते 15 जागा मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिलीय. मविआमध्ये जागा वाटपावरुन सर्वच चित्र समाधानकारक, आलबेल असं नाहीय. जळगावातील रावेर लोकसभेच्या जागेवरुन असंतोषाची पहिली ठिणगी पडली आहे. “शेवटपर्यंत रावेर लोकसभेची जागा ही काँग्रेसचं लढणार, अन्यथा आघाडीमध्ये बिघाडी होणार” असं रावेर लोकसभेचे काँग्रेसचे माजी खासदार व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील यांनी म्हटलय.
रावेरची जागा मविआमध्ये कोण लढवणारय?
“आघाडीत आमचं जर कोणी ऐकत नसेल, तर काँग्रेसला गंभीर विचार करावा लागेल” काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील यांचा आघाडीच्या नेत्यांना एक प्रकारे हा इशारा आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील यांनी आघाडीच्या नेत्यांना एक प्रकारे इशारा दिला आहे. “भाजपाला जर सत्तेपासून दूर ठेवायचं नसेल, तर होऊ द्या मग बिघाडी” असं त्यांनी म्हटलय. रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे जाणार असल्याची चर्चा आहे. रावेर लोकसभेवर आपलाच दावा कायम असल्याच काँग्रेसने म्हटलय. त्यामुळे येणाऱ्या दिवसात महाविकास आघाडीला बरच मंथन कराव लागणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यापैकी 44 मतदारसंघाच्या जागवाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.